भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पदवीधर मेळाव्यात संवाद; पदवीधरांच्या प्रश्नांसाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याचा विश्वास.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी:- आज अहेरी येथील इंडीयन हॉल येथे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे भाजपा महायुतीच्या वतीने पदवीधर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला पदवीधर बंधू-भगिनींसह भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. भाजपा महायुतीचे उमेदवार श्री.सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांनी उपस्थित पदवीधरांशी संवाद साधत आपल्या प्रचाराची सुरुवात केली.
मेळाव्यात पदवीधरांच्या विविध समस्या, त्यांच्या अपेक्षा तसेच शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास आणि भविष्यातील संधी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण व दुर्गम भागातील पदवीधरांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या प्रश्नांना प्रभावीपणे शासनदरबारी मांडण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी बोलताना श्री.सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांनी पदवीधरांच्या प्रश्नांसाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याचा विश्वास व्यक्त केला. पदवीधरांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगामी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपा महायुतीला पाठिंबा देत भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
दुर्गम भागातील पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी हा दुर्गम व आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरातील अनेक पदवीधर शिक्षण पूर्ण करून रोजगाराच्या संधींच्या शोधात आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी, कौशल्यविकास, रोजगाराच्या संधी तसेच उच्च शिक्षणाच्या उपलब्धतेसंदर्भातील प्रश्न याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मेळाव्यातून अधोरेखित करण्यात आले.
पदवीधरांच्या समस्या केवळ निवडणुकीपुरत्या मर्यादित न राहता त्या सातत्याने मांडल्या जाव्यात आणि त्यासाठी प्रभावी पाठपुरावा व्हावा, अशी अपेक्षा उपस्थित पदवीधरांनी व्यक्त केली. या प्रश्नांसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचा विश्वास उमेदवार श्री.सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांनी दिला.
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा शुभेच्छा संदेश.
दरम्यान, माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे कौटुंबिक कारणास्तव या मेळाव्यास प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी पदवीधर मेळाव्यासाठी शुभेच्छा संदेश पाठविला. आपल्या संदेशातून त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत श्री.सुधाकरजी विठ्ठलराव कोहळे यांचा निश्चित विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आपण त्यांच्या सोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या या शुभेच्छा संदेशामुळे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या संदेशाने भाजपा महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला बळ मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या मेळाव्यास माजी खासदार अशोकजी नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी आमदार नामदेवरावजी उसेंडी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तनुश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविभाऊ ओल्ललवार, प्रकाश गेडाम, प्रकाश गुडेल्लीवार, मोहुर्लेताई, जोशी सर, मंडळ अध्यक्ष श्रीनाथ राऊत, अर्जुन आलम, प्रसाद पुलूरवार, संजय सरकार, विकास तोडसाम, मंडळ नोंदणी प्रमुख प्रकाश मूलचेरा, यवन फुलके, रवी सादमवार, श्रीधर अनकारी यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने पदवीधर बंधू-भगिनी उपस्थित होते.
अहेरीतून सुरू झालेला हा प्रचारदौरा आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. पदवीधरांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यावर या मेळाव्यात भर देण्यात आला. अहेरीसह गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधरांचा विश्वास संपादन करून त्यांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत प्रभावीपणे आवाज देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या मेळाव्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात भाजपा महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, आगामी काळात पदवीधर मतदारांशी संपर्क वाढविण्यासाठी व्यापक अभियान राबविण्याचे संकेत यावेळी मिळाले.

Post a Comment
0 Comments