काँग्रेस नेते डॉ.कंकडालवार कडून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील आसा, नैनेर, कापेवंचा व कवठारम या अतिदुर्गम व आदिवासी बहुल गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करित वरील रस्त्याचे बांधकामाची योग्य चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आल्लापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असून,या कामावर राबलेल्या गरीब ट्रॅक्टर धारकांची व शेकडो आदिवासी मजुरांची लाखो रुपयांची मजुरी कंत्राटदाराने थकविल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे.
मजुरांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आणि वरील रस्त्याचे बांधकामाची चौकशी करण्यात यावी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी आज गडचिरोली येथे मा.जिल्हाधिकारी मा.पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले.
काय आहे संपूर्ण प्रकरण? - डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी मांडली व्यथा.
डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी निवेदनात म्हटले आहे की,अहेरी तालुक्यातील आसा ते कवठाराम हा रस्ता या भागाच्या दळणवळणाचा कणा आहे.पूर्वी येथे पक्का रस्ताच नव्हता.नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग,उपविभाग आलापल्ली मार्फत हा रस्ता मंजूर करून एका खाजगी कंत्राटदाराला देण्यात आला.
परंतु,दोन वर्षांपूर्वी या कंत्राटदाराने केवळ माती व मुरूम टाकून कच्चा रस्ता तयार केल्याचे दाखवले आणि त्यानंतर काम तसेच अर्धवट सोडून तो फरार झाला.या कामासाठी आसा,नैनेर,कपेवंचा,कवठाराम परिसरातील २० ते २५ गरीब ट्रॅक्टर धारकांनी आपले ट्रॅक्टर महिनोन् महिने कामाला लावले,तर शेकडो आदिवासी मजूर बांधवांनी कडक उन्हात आणि पावसात घाम गाळला.
धक्कादायक बाब म्हणजे,दोन वर्षे उलटूनही या कष्टकरी मजुरांना व ट्रॅक्टर धारकांना त्यांच्या कामाचा एक रुपयाही मोबदला कंत्राटदाराने दिलेला नाही.बिचारे मजूर दररोज कंत्राटदाराचे उंबरठे झिजवत आहेत.पण त्यांना फक्त आश्वासन मिळत आहे.दुसरीकडे रस्ता बंद असल्याने पावसाळ्यात या चारही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो.शाळकरी विद्यार्थी,गरोदर माता व गंभीर रुग्णांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांनी सादर केलेल्या निवेदनात ठोस मागण्या
१.आसा-नैनेर-कपेवंचा-कवठाराम या मार्गावरील बंद असलेले काम तात्काळ सुरू करून कायमस्वरूपी डांबरीकरण करावे, जेणेकरून आदिवासी नागरिकांचा वनवास संपेल.२.दोन वर्षांपासून थकीत असलेली ट्रॅक्टर धारकांची व मजुरांची संपूर्ण मजुरी संबंधित कंत्राटदाराकडून सक्तीने वसूल करून पीडितांना तात्काळ वितरित करावी.३.या रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची, निकृष्ट दर्जाच्या कामाची व मजुरांची पिळवणूक केल्याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्याला तात्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाकावे.
यावेळी डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की,जर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून गरीब मजूर बांधवांना त्यांची मजुरी मिळाली नाही आणि रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर समस्त पीडित नागरिक,ट्रॅक्टर धारक व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह मी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली समोर तीव्र आंदोलन व आमरण उपोषण छेडणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अहेरी तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून,गरीब मजुरांना न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.

Post a Comment
0 Comments