Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

ज्ञानमाता विद्यालयात ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ विविध उपक्रम उत्साहात




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755


स्वच्छता अभियान, रांगोळी व चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, रस्ता सुरक्षा मार्गदर्शन, ‘टाकाऊपासून टिकाऊ’ प्रदर्शन आणि आरोग्य तपासणीचे आयोजन


झरी, दि. ५ ऑक्टोबर :

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या वाटचालीच्या गौरवार्थ देशव्यापी जनसंपर्क अभियान म्हणून ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम विद्यालय, झरी येथे विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक आणि आरोग्यविषयक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.


दि. २१ सप्टेंबर रोजी ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत पालकांना ३०० रोपांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी ही रोपे शाळेच्या परिसरात तसेच आपल्या घरी लावून वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.


दि. २६ सप्टेंबर रोजी शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी रांगोळी व चित्रकला स्पर्धा, खाऊ वाटप, योगाभ्यास, पालकांना मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रस्ता सुरक्षेबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


दि. १ ऑक्टोबर रोजी स्काऊट-गाईडच्या माध्यमातून ‘खरी कमाई’ तसेच ‘टाकाऊपासून टिकाऊ’ वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून विविध उपयुक्त व आकर्षक वस्तू तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, सर्जनशीलता, पर्यावरण संवर्धन आणि पुनर्वापराची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


दि. ५ ऑक्टोबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, वसा व केंद्र झरी यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे टी.टी. लसीकरण तसेच सिकलसेल तपासणी करण्यात आली. या आरोग्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी होण्याबरोबरच आरोग्यविषयक जनजागृतीसही हातभार लागला.


‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ शाळेत विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक आणि जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळातही विविध नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.


या सर्व उपक्रमांचे यशस्वी नियोजन व आयोजन केल्याबद्दल शाळेच्या प्राचार्या सिस्टर बस्तियान फर्नांडिस तसेच ज्ञानमाता सदन सोसायटीचे संस्थासंचालक फादर नीलम लोपिस यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments