अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
विभागस्तरीय स्पर्धेत पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत तृतीय क्रमांकावर मोहोर
तलासरी, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रहाटोली, जि. ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्पांतर्गत आयोजित विभागस्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेत ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक आश्रम विद्यालय, झरी, ता. तलासरीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत भूमिका अभिनय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत ज्ञानमाता झरीच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत अत्यंत प्रभावी आणि दमदार भूमिका सादर करून परीक्षकांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या अभिनयातील आत्मविश्वास, संवादफेक, सादरीकरण आणि सामाजिक संदेश यामुळे त्यांच्या सादरीकरणाला विशेष पसंती मिळाली.
या स्पर्धेत प्रतिक्षा भोये, सोहिनी शनवार, वैशाली पडोले, आयुष चुंभले आणि अक्षित मालकरी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विभागस्तरावर विविध जिल्ह्यांमधून आलेल्या संघांमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांतून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शाळेच्या प्राचार्या सि. बस्तियान फर्नांडिस सातत्याने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असतात. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल ज्ञानमाता संस्था, तलासरी, प्रकल्प कार्यालय, डहाणू तसेच विविध स्तरांतील मान्यवर, पालक आणि शिक्षणप्रेमींकडून प्राचार्या, विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि संपूर्ण ज्ञानमाता झरी विद्यालयाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ज्ञानमाता झरीच्या विद्यार्थ्यांनी विभागस्तरावर मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Post a Comment
0 Comments