प्रमोद एन. चिंतलवार
तालुका प्रतिनिधी गडचिरोली
मो. नं. 9405133420
गडचिरोली : आदिवासी समाजाच्या शौर्य, स्वाभिमान आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या विरांगणा महाराणी दुर्गावती यांची जयंती समाज बांधवांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. बस स्टॉपजवळील विरांगणा महाराणी दुर्गावती चौक येथे जयंतीनिमित्त महाराणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाराणी दुर्गावती या भारतीय इतिहासातील शूर आणि कर्तृत्ववान महिला शासक म्हणून ओळखल्या जातात. गोंडवाना प्रदेशाच्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी त्यांनी धैर्याने संघर्ष केला. संकटाच्या काळातही त्यांनी शरणागती न पत्करता आपल्या भूमी, संस्कृती आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी शेवटपर्यंत लढा दिला. त्यांच्या शौर्याची आणि त्यागाची प्रेरणा आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे.
जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांनी महाराणी दुर्गावती यांच्या शौर्य, त्याग, स्वाभिमान आणि सामाजिक योगदानाचे स्मरण केले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श नवीन पिढीने आत्मसात करून शिक्षण, सामाजिक एकोपा, महिला सक्षमीकरण आणि समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास पुष्पलता कुमरे, महिला जिल्हाध्यक्षा, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद; आरती कोल्हे, अध्यक्ष, जंगोरायताड आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्था; लीना कोकोडे, शारदा मडावी, रोहिणी मसराम, वनिता ताराम, शशिकला जांगी, अर्चना मडावी, निर्मला कुमरे, निर्मला ऊईके, निकिता कुमरे यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती.
“महाराणी दुर्गावतींच्या शौर्याची प्रेरणा घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करूया,” असा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment
0 Comments