प्रमोद नामदेव चिंतलवार
तालुका प्रतिनिधी गडचिरोली
मो. 9405133420
गडचिरोली : जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित ‘जलसेवा संकल्प अभियान–२०२६’चा समारोप समारंभ आज गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दि. २ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानादरम्यान जलसंवर्धन, पाणी बचत, सिंचन व्यवस्थापन, जलजागृती, शेतकरी मार्गदर्शन, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व लोकसहभाग यावर आधारित विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वशांतीदूत श्री. प्रकाश अर्जुनवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते तथा जलप्रेमी श्री. मनोहर हेपट होते. प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या प्राध्यापिका श्रीमती स्नेहा वनकर, प्रभू फाउंडेशन, चंद्रपूरचे अध्यक्ष श्री. राहुल गुडघाने तसेच कार्यक्रमाचे आयोजक गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राहुल मोरघडे उपस्थित होते.
जलसंवर्धन व जलव्यवस्थापनाचा संदेश
प्रास्ताविकातून उपविभागीय अधिकारी श्री. ज्ञानेश्वर धकाते यांनी अभियानाची उद्दिष्टे व राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
प्राध्यापिका श्रीमती स्नेहा वनकर यांनी पाण्याची गुणवत्ता, जलप्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन तसेच जलसंवर्धनामध्ये महिला व युवा पिढीच्या सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले.
श्री. प्रकाश अर्जुनवार यांनी जलव्यवस्थापनासोबतच पिंपळ, वड, कडुनिंब यांसारख्या देशी वृक्षांचे संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवनाची आवश्यकता अधोरेखित केली.
श्री. राहुल गुडघाने यांनी पाणी वापर संस्थांच्या बळकटीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच दुष्काळी परिस्थितीत दिना प्रकल्पातील पाणी वापर संस्था व जलसंपदा विभागाच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या नियोजनबद्ध सिंचन व्यवस्थापनाचे कौतुक करून त्याची यशोगाथा मांडली.
गोंडवाना विद्यापीठाचे प्राध्यापक श्री. गावंडे यांनी पाणी वापर संस्थांची भूमिका आणि जलसंवर्धनामध्ये नागरिकांची कर्तव्यपरायणता याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात श्री. मनोहर हेपट यांनी जलजागृतीसाठी व्यापक लोकसहभागाची गरज व्यक्त करून पाणी संवर्धन व वापराबाबत प्रभावी उपाययोजनांची आवश्यकता अधोरेखित केली.
अभियानातील विविध उपक्रमांचा संक्षिप्त आढावा
अभियानाच्या कालावधीत जलपूजन व जलदिंडी, जलजागृती व जनसंपर्क कार्यक्रम, पाणी वापर संस्थांबाबत मार्गदर्शन, सिंचन ई-प्रणाली व पाणीपट्टीबाबत तक्रार निवारण, कालवा-धरण परिसर स्वच्छता, कालवा व वितरण व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी, आवश्यक दुरुस्तीची कामे निश्चित करणे, पुनर्वसित गावांना भेटी व प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींचे निराकरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यासोबतच भूसंपादन, पुनर्वसन व वनजमिनीशी संबंधित बाबींवर लाभधारकांमध्ये जनजागृती, पिक पद्धती व पाणी नियोजनाबाबत कृषी विभागाच्या सहकार्याने बैठका व कार्यशाळा, शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्थापनाचे मार्गदर्शन, महिला शेतकरी सक्षमीकरण कार्यक्रम, लाभधारक मेळावे व चर्चासत्रे आयोजित करण्यात आली.
शाळा व महाविद्यालयांमध्ये चित्रकला, वक्तृत्व व जनजागृतीपर स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्यात आली. तसेच विविध ठिकाणी वृक्षारोपण, जलस्रोत परिसर स्वच्छता आणि पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यकारी अभियंता श्री. राहुल मोरघडे यांनी अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. तसेच बदलते हवामान, अल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जलव्यवस्थापनाची गरज, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आणि जलसमृद्धीसाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय लिपिक श्री. रुपेश लाडे व आभार प्रदर्शन सहाय्यक अभियंता श्रेणी–१ श्री. अमित डोंगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाखा अभियंता श्री. राहुल दाभाडे यांनी विशेष कार्य केले.
समारोप कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी व सभासद, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलसंवर्धन, पाणी बचत आणि शाश्वत सिंचन व्यवस्थापनाचा संदेश जनमानसात रुजवत लोकसहभागातून जलसंपदा संवर्धनाचा संकल्प अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Post a Comment
0 Comments