Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

बेसेवाडा गावातील १० वर्षांपासून बंद वीजपुरवठा सुरू करा; CPI ची मागणी

 



गावकऱ्यांनी कॉ. सचिन मोतकुरवार यांच्याकडे मांडल्या समस्या; महावितरण एटापल्लीला निवेदन, विकास मागणीसाठी आंदोलनाचा इशारा


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

मो. 8208166961


एटापल्ली : ग्रामपंचायत गट्टा अंतर्गत येणाऱ्या बेसेवाडा गावातील मागील सुमारे १० वर्षांपासून बंद असलेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने महावितरणच्या एटापल्ली येथील उपकार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.


बेसेवाडा गावातील नागरिकांनी CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांची भेट घेऊन मागील दहा वर्षांपासून वीजपुरवठा बंद असल्यामुळे उद्भवणाऱ्या विविध अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. वीज नसल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून रात्रीच्या वेळी प्रकाशाची समस्या निर्माण होते. विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करताना अडचणी येतात, तसेच मोबाईल चार्जिंग, घरगुती कामे आणि इतर आवश्यक सुविधांसाठीही त्रास सहन करावा लागतो. आधुनिक काळातही गावाला वीजेसारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.


गावात पूर्वी वीजपुरवठा सुरू होता; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तो बंद असल्याने नागरिकांना अंधारात जीवन जगावे लागत आहे. गावातील अनेक कुटुंबे अधिकृत वीजजोडणी घेण्यास तयार असूनही वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने त्यांना या सुविधेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे महावितरणने गावाची तातडीने स्थळपाहणी करून वीजपुरवठा बंद असण्याची कारणे तपासावीत, अशी मागणी करण्यात आली.


आवश्यकतेनुसार वीजखांब, वीजवाहिन्या व इतर विद्युत साहित्याची दुरुस्ती किंवा नवीन उभारणी करावी. गरज असल्यास नवीन रोहित्र बसवून पात्र कुटुंबांना अधिकृत वीजजोडण्या द्याव्यात आणि संपूर्ण कामासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.


यावेळी CPI गडचिरोली जिल्हा समितीचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले की, “गावातील नागरिकांना दहा वर्षांपासून वीजेसारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. गावकऱ्यांनी आपल्या अडचणी आमच्यासमोर मांडल्या असून त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी ठामपणे पाठपुरावा करेल. महावितरणने तातडीने कार्यवाही करून बेसेवाडा गावातील वीजपुरवठा पूर्ववत करावा.”


यावेळी CPI चे जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार यांच्यासह बेसेवाडा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महावितरणने या मागणीची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. बेसेवाडा गावाच्या विकासाच्या मागण्यांकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा गावकऱ्यांच्या वीज हक्कासाठी आणि विकासाच्या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

Post a Comment

0 Comments