विभागांनी समन्वयाने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
अमरावती, दि. 21 :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी सोमवार, दि. 25 मे रोजी अधिसुचना प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 453 मतदार असून उपविभागीय अधिकारी स्तरावर मतदान केंद्र राहणार आहे, निवडणुकीसाठी अल्प कालावधी असल्याने सर्व विभागांनी समन्वाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणूक निमित्ताने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे निवडणुकीशी संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी लागणारी आचारसंहिता जशीच्या तशी लागू करण्यात आली आहे. याची नोंद निवडणुकीशी संबंधितांनी घ्यावी. मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी उपविभागीय स्तरावर मतदान केंद्र राहणार आहे. मतदारांची ड्राफ्ट यादी तयार झाली असून सर्व राजकीय पक्षांना ती पाठविण्यात येईल. यावरील हरकतीनंतर मतदारयादी अंतिम करण्यात येणार आहे. आचारसंहितेसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती नेमणे आवश्यक आहे. त्यानुसार कारवाई करण्यात यावी.
आचारसंहितेच्या कालावधीत कामे प्रस्तावित करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती स्थापन करण्यात आली आहे. कामे प्रस्तावित करणे आवश्यक असल्यास या समितीकडे पाठविण्यात याव्यात. मतदार कमी असल्याने त्यांना प्रलोभन देण्याचे प्रकार होण्याची शक्यता असल्याने याबाबत काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिली.

Post a Comment
0 Comments