माहूर प्रतिनिधी
आदित्य खंदारे
माहूर परिसरात पाण्याअभावी मृत्यूमुखी पडलेल्या रानडुकरांच्या घटनांकडे वनविभागाने अक्षरशः डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या गंभीर विषयावर वृत्तपत्रांत वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही वनविभाग मात्र झोपेचे सोंग घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे जंगल परिसरात रानडुकरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. रेणुकादेवी मंदिराकडे जाताना गायमुख समोरील वळणा जवळ रोड वरच सुमारे चार पाच दिवसा आधी पाण्या अभावी रान डुकराचा मृत्यू झाला होता. ते आता सडून मोठा दुर्गंध पसरला आहे.
मात्र, मृत प्राण्यांची विल्हेवाट लावणे, परिसराची स्वच्छता करणे किंवा दुर्गंधी रोखण्यासाठी कोणतीही प्रभावी कार्यवाही वनविभागाकडून करण्यात आलेली नाही. परिणामी अनेक ठिकाणी मृत रानडुकरांचे शव सडून तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
विशेष म्हणजे, माहूरच्या प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी रेणुका माता मंदिर शिखर, अनुसया माता मंदिर परिसर तसेच वझरा, वानोळा आणि इतर ग्रामीण भागातील रस्त्यांवरून दररोज हजारो भाविक व नागरिकांची ये-जा असते. या मार्गांवरून प्रवास करताना दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक दाबून प्रवास करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, वन्यजीवांचे संरक्षण आणि व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या वनविभागाने मृत प्राण्यांची तात्काळ विल्हेवाट लावणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भाविकांनीही नाराजी व्यक्त करत, "धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवर अशी दुर्गंधी असणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. लाखो रुपये खर्चून पर्यटन व धार्मिक विकासाच्या घोषणा केल्या जातात, पण मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी वेळ मिळत नाही का?" असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे सडलेल्या मृत प्राण्यांपासून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभागाने तातडीने मृत रानडुकरांची विल्हेवाट लावून परिसर निर्जंतुक करावा, अशी मागणी नागरिक आणि भाविकांकडून होत आहे.
"वृत्तपत्रातील बातम्यांकडे दुर्लक्ष, दुर्गंधीकडेही दुर्लक्ष; मग वनविभाग नेमका जागा कधी होणार?" असा संतप्त सवाल आता माहूरकर विचारत आहेत.

Post a Comment
0 Comments