Type Here to Get Search Results !

विहाराचे फोटो काढल्याच्या कारणावरून कुपटी येथे एका कुटुंबावर दगडफेक व मारहाण




माहूर प्रतिनिधी 

आदित्य खंदारे 

माहूर तालुक्यातील मौजे कुपटी  येथे बुद्ध विहारातील फोटो काढल्याच्या कारणावरून एका कुटुंबावर दगडफेक व मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कुपटी गावातील बुद्ध विहारामध्ये “वितू बाबा” नामक पुतळा बसविण्यात आला होता. सदर बाब समाजाच्या निदर्शनास आल्यानंतर समाज बांधवांनी भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पुतळा हटविण्यासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन केले होते. त्यावेळी पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने पंधरा दिवसांच्या आत पुतळा काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते.


दरम्यान, पंधरा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर समाजाच्या माध्यमातून गावातील अनिल साळवे यांना बुद्ध विहारातील सद्यस्थितीचे फोटो काढून पाठविण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार अनिल साळवे यांनी विहारात जाऊन फोटो काढले व ते प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आले.


याचाच राग मनात धरून गावातील काही समाजकंटकांनी अनिल साळवे यांच्या घरावर दगडफेक करत हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


या घटनेनंतर अनिल साळवे यांनी रात्री सुमारे १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान माहूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार दाखल केली. संबंधित आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.


या घटनेमुळे कुपटी गावासह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments