भात पिकावरील कीड-रोग नियंत्रणासाठी सज्जता; कोसबाड येथे घडीपत्रिकेचे उद्घाटन
अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
आगामी खरीप हंगामात भात पिकावरील कीड व रोगांचे प्रभावी व्यवस्थापन करून शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक माहिती वेळेत पोहोचावी, यासाठी कृषी विभागाने तयारीला वेग दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘भात पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प’ (क्रॉपसॅप) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिरास उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते भात पिकावरील कीड व रोग व्यवस्थापनासंदर्भातील मार्गदर्शक घडीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या चारही तालुक्यांतील कृषी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
खरीप हंगामात क्षेत्रीय स्तरावर काम करताना कोणतीही त्रुटी राहू नये तसेच शेतकऱ्यांना योग्य वेळी अचूक सल्ला मिळावा, यासाठी विश्वास बर्वे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना केल्या. प्रशिक्षण शिबिरास कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच विविध क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूण ९० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन
शिबिरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. उत्तम सहाणे यांनी क्रॉपसॅप अंतर्गत भात पिकावरील कीड व रोगांचे अचूक निरीक्षण, त्यांचे वाचन (रीडिंग), कीड ओळखण्याच्या पद्धती आणि शास्त्रीय पद्धतीने नोंदी घेण्याबाबत सविस्तर माहिती दिली. क्षेत्रीय स्तरावर सर्वेक्षण करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
एसआरटी तंत्रज्ञानाची माहिती
भात उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सगुणा राईस टेक्निक (एसआरटी) या तंत्रज्ञानाविषयीही विशेष सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी सुजाता लोंढे यांनी एसआरटी साचा आणि ट्रेच्या वापराबाबत तांत्रिक माहिती देत या पद्धतीमुळे वेळ, श्रम आणि उत्पादन खर्चात कशी बचत होते, यावर प्रकाश टाकला.
कार्यशाळेत भात पिकावर आढळणाऱ्या विविध कीड व रोगांमुळे होणारे आर्थिक नुकसान, त्यांची आर्थिक नुकसान पातळी आणि एकात्मिक व्यवस्थापनाच्या उपाययोजनांची माहिती क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आली. या प्रशिक्षणामुळे आगामी खरीप हंगामात भात पिकावरील कीड व रोगांचे वेळेत निदान व नियंत्रण करण्यास मदत होणार असून, त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कोट
“प्रशिक्षणाच्या माध्यमातून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान अधिक सक्षम झाले आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात भात पिकावरील कीड व रोगांचे वेळेत नियंत्रण करून शेतकऱ्यांना प्रभावी मार्गदर्शन करता येईल.”
— विश्वास बर्वे, उपविभागीय कृषी अधिकारी, पालघर.

Post a Comment
0 Comments