Type Here to Get Search Results !

यारी दोस्ती फाऊंडेशनचा अनोखा सामाजिक उपक्रम; शिक्षण, पर्यावरण आणि माणुसकीचा सुंदर संगम




चौथ्याची वाडीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गरजूंना छत्री वाटप आणि वृक्षसंवर्धनाचा संकल्प


अरविंद बेंडगा

 पालघर जिल्हा प्रतिनिधी 


सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि माणुसकीचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम यारी दोस्ती फाऊंडेशन, पालघर यांच्या वतीने रविवारी (दि. २१ जून) जव्हार तालुक्यातील चौथ्याची वाडी येथील शाळेत उत्साहात पार पडला. ‘माणुसकीची छत्री’, शैक्षणिक साहित्य वाटप, चित्रकला स्पर्धा, रक्तदात्यांचा सन्मान आणि वृक्षलागवड संकल्प अशा विविध उपक्रमांमुळे कार्यक्रमाला सामाजिक जाणीवेची अनोखी किनार लाभली.

यारी दोस्ती ग्रुपमधील सदस्यांनी स्वखर्चातून आणि लोकसहभागातून निधी उभारून समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गरजू व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना ‘माणुसकीची छत्री’ या उपक्रमांतर्गत छत्री वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत उत्कृष्ट चित्रे साकारलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पेन, पेन्सिल, रबर, वह्या आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘एक सदस्य – एक वृक्ष’ हा उपक्रम राबविण्यात आला. यारी दोस्ती ग्रुपच्या प्रत्येक सदस्याने या पावसाळ्यात किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला. पर्यावरण रक्षणासाठी तरुणांनी घेतलेला हा निर्धार उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

याचबरोबर समाजातील गरजूंना जीवनदान देणाऱ्या रक्तदात्यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. विविध रुग्णांसाठी रक्तदान करणाऱ्या यारी दोस्ती ग्रुपच्या सदस्यांना प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यारी दोस्ती ग्रुपच्या सदस्यांनी समाजासाठी केलेल्या या बहुआयामी उपक्रमामुळे शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश देण्यात यश मिळाले. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा समाजोपयोगी कार्याची सातत्याने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments