Type Here to Get Search Results !

वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा आदर्श; अशोक भोईर यांच्याकडून धानिवरी दुर्घटनाग्रस्त १४ कुटुंबांना मदतीचा हात




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 


कासा :- वाढदिवस हा केवळ शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी जपण्याची संधी असते, याचा आदर्श राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पालघर जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर यांनी आपल्या कृतीतून घालून दिला.

वाढदिवसानिमित्त कोणताही औपचारिक सोहळा न करता त्यांनी बापुगाव येथील लाखातपाडा परिसराला भेट देत धानिवरी येथे झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत बाधित झालेल्या १४ कुटुंबांना महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

धानिवरी दुर्घटनेनंतर संबंधित कुटुंबांवर दुःखासोबत आर्थिक अडचणींचाही मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक कुटुंबाला धान्य व किराणा साहित्य देण्यात आले. आगामी शेती मशागतीच्या कामांच्या काळात कुटुंबांना दैनंदिन गरजांसाठी अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मदत साहित्यामध्ये तूर डाळ, चना, मसूर डाळ, वाटाणा, चवळी, साखर, खाद्यतेल, साबण, सोनपापडी तसेच इतर आवश्यक वस्तूंचा समावेश होता. या मदतीमुळे संबंधित कुटुंबांना मानसिक व आर्थिक आधार मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

याचवेळी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका गरजू विद्यार्थिनीला शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये आणि शिक्षणाद्वारे उज्ज्वल भविष्य घडावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे अशोक भोईर यांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत वाढदिवस साजरा करण्याची समाजाभिमुख पद्धत प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

या उपक्रमावेळी जयवंत काटेला आणि कैलास माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पालघर जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर व युवा अध्यक्ष करण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम पार पडला.

उपस्थितांनी अशोक भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments