Type Here to Get Search Results !

वारकरी संप्रदायातील सर्व कीर्तनकारांनी भामचंद्र मुक्ती लढ्याची कथा कीर्तनातून जनजागृती करावी




अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांचे सर्व वारकरी संप्रदायाला पत्राद्वारे आवाहन


स्नेहा उत्तम मडावी 

पुणे शहर प्रतिनिधी 


बीड :- वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार, विविध संत संस्थांचे पदाधिकारी, दिंडी प्रमुख, पालखी सोहळ्यांचे संस्थापक-अध्यक्ष तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानाशी संबंधित सर्व मान्यवरांनी भामचंद्र मुक्ती लढ्याबाबत व्यापक जनजागृती करावी, अशी कळकळीची विनंती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, संयुक्त सरचिटणीस राजेश घाणेकर, आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख बब्रुवान शेंडगे पाटील तसेच राज्य प्रवक्ते श्रीराम महाराज शेळके यांनी एका पत्राद्वारे केली आहे.वारकरी संप्रदायातील सर्व प्रमुखांना पाठविण्यात आलेल्या या पत्रात भामचंद्र, भंडारा आणि घोराडेश्वर परिसराच्या संवर्धनासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे आध्यात्मिक गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कार्याचा उल्लेख करून भामचंद्र पर्वतरांगांचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.पत्रात नमूद करण्यात आले आहे की, स्वराज्य स्थापनेच्या महान कार्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणाऱ्या संत परंपरेचे योगदान अनन्यसाधारण आहे. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांची यशोगाथा आपण कथा, कीर्तन, कादंबऱ्या आणि चित्रपटांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवत आलो आहोत. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांची साधना भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देहू परिसरातील भामचंद्र, भंडारा आणि घोराडेश्वर या पवित्र स्थळांचे संरक्षण करणे हे प्रत्येक वारकरी आणि शिवभक्ताचे कर्तव्य आहे.

सध्या विकासाच्या नावाखाली या परिसरात होत असलेल्या विविध कामांमुळे या पवित्र साधना भूमीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होत असल्याची भावना अनेक वारकरी, संत आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. भामचंद्र, भंडारा आणि घोराडेश्वर हे केवळ डोंगर नसून ते वारकरी संप्रदायाच्या अध्यात्मिक इतिहासाचे साक्षीदार आहेत. अनेक संत, साधक आणि महात्म्यांनी या ठिकाणी तपश्चर्या करून समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे.पत्रात पुढे म्हटले आहे की, वारकरी संप्रदायातील असंख्य साधकांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे समाजप्रबोधनासाठी अर्पण केली. कीर्तन, प्रवचन आणि अभंगांच्या माध्यमातून धर्मजागृती, समाजजागृती आणि राष्ट्रजागृतीचे कार्य सातत्याने सुरू ठेवले. आज जो वारकरी संप्रदाय जगभर पोहोचला आहे, त्यामागे अनेक पिढ्यांचे समर्पण, त्याग आणि परिश्रम आहेत. त्यामुळे या परंपरेची पवित्र साधनास्थळे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.“छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंची साधना भूमी उद्ध्वस्त होत असताना आपण केवळ प्रेक्षक बनून राहणार आहोत का?” असा सवालही या पत्रातून उपस्थित करण्यात आला आहे. वारकरी संप्रदायातील प्रत्येक कीर्तनकार, प्रवचनकार, दिंडीप्रमुख आणि पालखी सोहळ्याचे कार्यकर्ते यांनी आपल्या कार्यक्रमांमधून भामचंद्र मुक्ती लढ्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा हा वारकरी संप्रदायाचा पंचमवेद मानला जातो. या गाथेतून समाजाला सत्य, करुणा, भक्ती आणि धर्मरक्षणाचे संदेश दिले गेले आहेत. त्यामुळे संतांच्या शिकवणीचा आदर करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याने आपल्या साधना भूमीच्या रक्षणासाठी पुढे यावे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या जनजागृती अभियानासाठी मराठवाडा विभागात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब फपाळ पाटील, सरचिटणीस प्रकाश मामा पाटील, जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराम सोंडगे तसेच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईकवडे हे मराठवाड्यातून जाणाऱ्या विविध दिंड्यांमध्ये सहभागी होऊन भामचंद्र मुक्ती लढ्याची जनजागृती करणार आहेत.संबंधित पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत अनेक कथा-कीर्तन, प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमांमधून भामचंद्र संवर्धनाचा विषय प्रभावीपणे मांडला असून मराठा महासंघाने केलेल्या आवाहनाची माहिती वारकरी बांधवांपर्यंत पोहोचवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ही जनजागृती आणखी व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

वारकरी संप्रदायातील सर्व ह.भ.प., कीर्तनकार, दिंडीप्रमुख, पालखी सोहळा आयोजक आणि संत संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन भामचंद्र, भंडारा आणि घोराडेश्वर या पवित्र स्थळांच्या संरक्षणासाठी समाजात जागृती निर्माण करावी, असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे. संतांची परंपरा, शिवरायांचे विचार आणि अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी हा लढा असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments