Type Here to Get Search Results !

लोककल्प फाउंडेशनचा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक हातभार; तलासरी विद्यालयाला संगणक, प्रिंटर व ग्रीन बोर्डची भेट





डिजिटल शिक्षणाची नवी वाट खुली; छत्रपती शिक्षण मंडळ विद्यालयाला शैक्षणिक साहित्याचे वितरण


अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 


आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडण्यासाठी लोककल्प फाउंडेशनने पुढाकार घेत तलासरी येथील छत्रपती शिक्षण मंडळ माध्यमिक विद्यालयाला शैक्षणिक साहित्याची महत्त्वपूर्ण देणगी दिली. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. किरण डी. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यालयास ५ संगणक संच, १ प्रिंटर तसेच १० ग्रीन बोर्ड प्रदान करण्यात आले. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण, डिजिटल साक्षरता आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे.

यावेळी सहाय्यक विभागीय व्यवस्थापक चंदन पारायणे, मुख्य व्यवस्थापक स्वप्नील चिखलकर, सीएसआर सहाय्यक प्रसाद मळीक, कार्यालय सहाय्यक सुनील लांजेकर तसेच कार्यालय लिपिक रोशन कोळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शाळेला शैक्षणिक साहित्य सुपूर्द करण्यात आले.

शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दीपक पाटील यांनी लोककल्प फाउंडेशन व लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे आभार व्यक्त करत, या साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला. श्री उदयदादा कुलकर्णी यांच्या समन्वयातून शाळेला ही देणगी प्राप्त झाली.

शिक्षण क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी जपत लोककल्प फाउंडेशनने राबविलेला हा उपक्रम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, डिजिटल युगातील ज्ञानसंपन्न पिढी घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Post a Comment

0 Comments