"आज एका बैलाचा बळी... उद्या माणसाचा तर नाही ना?" – हलदपाडा ग्रामस्थांचा संतप्त सवाल; पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका
अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
डहाणू तालुक्यातील हलदपाडा येथे विद्युत विभागाच्या कथित निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याच्या बैलाचा करंट लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, घटनेला आठवडाभराहून अधिक कालावधी उलटूनही ना तलाठ्याकडून पंचनामा करण्यात आला, ना संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली, तर नुकसानभरपाईचाही पत्ताच नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 23 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास चार बैल चरण्यासाठी गेले असताना विद्युत प्रवाहाचा धोका निर्माण झाला. त्यापैकी तीन बैलांचा जीव वाचवला, मात्र एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्याचा हा बैल दगावल्याने त्याच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शेतीची कामे कशी करायची, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला आहे.
घटनेनंतर वायरमन आणि संबंधित अभियंता (इंजिनिअर) यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, त्यानंतर कोणतीही अधिकृत कार्यवाही, पंचनामा किंवा आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे केवळ घटनास्थळी भेट देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाला का, असा सवालही उपस्थित होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हलदपाडा परिसरात नुकतेच उभारण्यात आलेले अनेक विद्युत खांब व त्यासंदर्भातील काम निकृष्ट दर्जाचे असून सुरक्षिततेच्या निकषांचे पालन करण्यात आलेले नाही. या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून संपूर्ण कामाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, मुक्या जनावराचा मृत्यू होऊन अनेक दिवस उलटले तरी वीज विभागाकडून अपेक्षित तत्परता दिसून आलेली नाही. पंचनामा नसल्याने नुकसानभरपाईची प्रक्रियाही रखडली असून संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याचा आधार असलेला बैल गेला आणि प्रशासन मात्र कागदोपत्री हालचालींची वाट पाहत बसले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित अभियंता साबळे यांची बाजू जाणून घेण्यासाठी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तीन ते चार वेळा फोन करूनही त्यांनी कॉल स्वीकारला नाही. तसेच व्हॉट्सअॅपद्वारे संदेश पाठवून प्रतिक्रिया मागविण्यात आली, मात्र त्यालाही कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, "आज एका बैलाचा बळी गेला आहे; उद्या एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?" निकृष्ट दर्जाची कामे, अधिकाऱ्यांची उदासीनता आणि कारवाईतील दिरंगाई यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी वायरमॅन ,अधिकारी, कंत्राटदार , व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, मृत बैलाच्या मालकाला तातडीने नुकसानभरपाई द्यावी आणि हलदपाडा परिसरातील सर्व विद्युत खांब व विद्युत यंत्रणेची सुरक्षा तपासणी करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
"अधिकारीच जर हलगर्जीपणा करत असतील, तर सामान्य जनतेने न्यायासाठी दाद कुणाकडे मागायची?" हा प्रश्न आता हलदपाड्यातील नागरिकांकडून प्रशासनाला थेट विचारला जात आहे.

Post a Comment
0 Comments