Type Here to Get Search Results !

सूर्या नदीत मासेमारी जीवावर बेतली; पन्नाशीतील व्यक्ती बेपत्ता, मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडथळे

 



दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत शोधमोहीम सुरू; पूरस्थितीत नदीपात्रात न जाण्याचे पोलिसांचे आवाहन



अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755


पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा धोकादायक परिस्थितीत डहाणू तालुक्यातील सूर्या नदीत मासेमारीसाठी गेलेले ५५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल जान्या केदार (वय ५५, रा. पेठ, ता. डहाणू) हे पावसाळ्याच्या सुरुवातीला नदीत वरच्या भागाकडे येणारे वलगणीचे मासे पकडण्यासाठी सूर्या नदीकाठी गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.


नातेवाईक आणि ग्रामस्थांनी नदीकाठ, परिसर तसेच नदीपात्रात शोधमोहीम राबविली. मात्र, त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांच्या मुलाने कासा पोलीस ठाण्यात धाव घेत वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात मनुष्य बेपत्ता क्रमांक १७/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे.


घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस, नदीतील प्रचंड वाढलेला प्रवाह आणि प्रतिकूल हवामानामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. तरीही पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल केदार यांचा रंग सावळा, केस काळे, नाक लांब व सरळ असून ते मराठी भाषा बोलतात. घरातून बाहेर पडताना त्यांनी पांढऱ्या रंगाची अंडरवेअर व त्यावर टॉवेल नेसला होता.


दरम्यान, मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांमध्ये पाण्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी मासेमारी, पोहणे किंवा इतर कोणत्याही कारणासाठी नदीपात्रात जाण्याचे धाडस करू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments