भंडारा, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
✍️भवन लिल्हारे ✍️ मो.नं.9373472847 /8888519894
गोंदिया :( दिनांक २२ जुलै २०२६) मध्य प्रदेशातील फोर्टिफाइड तांदूळ घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणात गोंदिया येथून दोन राइस मिल मालकांना सोमवारी (दि. २०) ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोघांवर एफसीआय गोदामातून एशियन प्लांटच्या नावाने काढलेल्या फोर्टिफाइड तांदळाची खरेदी व त्याच्या अवैध व्यापारात सहभागी असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गोंदिया जिल्ह्यातील आणखी काही राइस मिलर्सची चौकशी होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी मध्यप्रदेश पोलिसांनी आठ राइस मिल मालक व दलालांना अटक केली होती. गोंदियातील दोन राइस मिल मालकांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणातील ताब्यात घेतलेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी एशियन प्लांटचा संचालक व शिवनीचे काही राइस मिल चालक, ट्रान्स्पोर्टर आणि इतर संबंधित लोक अजूनही फरार आहेत. एसआयटीच्या माहितीनुसार फरार आरोपींचा शोध सुरू आहे आणि लवकरच त्यांना अटक केली जाऊ शकते. एफसीआय गोदामातून एशियन प्लांटच्या नावावर फोर्टिफाइड तांदळाची उचल करण्यात आली. यानंतर हा तांदूळ नियोजित ठिकाणी पोहोचविण्याऐवजी विविध राइस मिलमध्ये उतरवून अवैधपणे विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे मध्यप्रदेश सरकार या तांदळावर अनुदान देते. सरकारी दरानुसार याची किमत प्रतिक्विंटल २२०० रुपये असून, त्याची पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दराने काही राइस मिल मालकांनी दलालांच्या माध्यमातून विक्री केल्याची माहिती आहे. हा सरकारी तांदूळ असल्याने याची खुल्या बाजारपेठेत विक्री करता येत नाही.
*पाच हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त तांदूळ जप्त*
एसआयटीच्या मते, आतापर्यंत पाच हजार मेट्रिक टनपेक्षा अधिक फोर्टिफाइड तांदूळ जप्त करण्यात आला आहे. ज्याची अंदाजित किंमत १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त, एशियन प्लांटच्या नावावर रवाना केलेला तांदूळ विविध राइस मिलपर्यंत पोहोचवणाऱ्या २० पेक्षा अधिक ट्रक मध्यप्रदेश पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.
*मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता*
या संपूर्ण नेटवर्कच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा सरकारी फोर्टिफाइड तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये आणखी अनेकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे तांदळाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हा तांदूळ कुठे कुठे विक्री करण्यात आला याची माहिती पुढे आली. त्यानंतर आता मध्य प्रदेश पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments