Type Here to Get Search Results !

विवा कॉलेजमध्ये पर्यावरण, स्वच्छता व सर्जनशीलतेचा संगम; विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



✍🏻 दिलीप करकरे ✍🏻

माणगाव तालुका प्रतिनिधी 

(रायगड)-7208708456


माणगाव :- प्रोफेशनल एज्युकेशन सोसायटी संचलित विवा कॉलेज, माणगाव येथे चेअरमन सौ. विनया विवेक ढेपे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा अशा विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महाविद्यालय परिसर सेवाभाव, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने भारावून गेला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी वृक्षारोपणाने झाली. महाविद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. त्यानंतर आयोजित स्वच्छता अभियानात विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्रित श्रमदान करत स्वच्छ परिसराचा संकल्प प्रत्यक्ष कृतीतून साकारला.

यानंतर झालेल्या चित्रकला व निबंध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, स्वच्छ भारत अभियान, सामाजिक मूल्ये आणि राष्ट्रप्रेम या विषयांवर आपल्या कल्पकतेचा व विचारांचा प्रभावी आविष्कार सादर केला. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजाभिमुख विचारसरणी, नेतृत्वगुण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले.

हा उपक्रम चेअरमन सौ. विनया विवेक ढेपे, उपाध्यक्ष डॉ. विवेक ढेपे, प्राचार्य प्रा. योगेश रानभरे तसेच उपविभागप्रमुख प्रा. प्रसाद तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

समारोपप्रसंगी सर्वांनी पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्व जपण्याची सामूहिक शपथ घेतली. महाविद्यालयाच्या वतीने सर्व सहभागींचे आभार मानण्यात आले असून, भविष्यातही समाजहित व पर्यावरण संवर्धनासाठी असे विधायक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments