व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी. गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर, छत्तीसगड सीमेवर वसलेले, जिथे वीज आणि बसचीही पूर्ण सोय नव्हती, अशा एका छोट्याशा गावातून (येचली) आलेल्या एका कन्येने राज्यभरातील मुलींसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. ममता सुरेश सारमपल्लीवार या तरुणीने परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी धडक मारली आहे.
**हलाखीच्या परिस्थितीतून स्वप्नांची मजल**
ममता यांचे प्राथमिक शिक्षण येचली येथे, तर माध्यमिक शिक्षण चिचोळा येथील आश्रमशाळेत झाले. आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. दिवसाला शंभर रुपयांसाठी कष्ट करणाऱ्या पालकांनी ममताच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट हेच तिचे सर्वात मोठे प्रेरणास्थान ठरले. आलापल्ली येथे पदवी पूर्ण केल्यानंतर, कौटुंबिक जबाबदारीमुळे पुढील शिक्षण थांबवावे लागले. मात्र, मनात शिक्षणाची आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द तशीच होती.
**लग्नानंतरही जिद्द कायम**
२०१७ मध्ये लग्न झाल्यानंतरही ममता यांनी हार मानली नाही. पतीच्या भक्कम पाठिंब्यामुळे त्यांनी गडचिरोलीत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि २०१८ मध्ये त्या पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्या. मुलचेरा येथे पहिली पोस्टिंग मिळाल्यानंतरही त्यांनी अभ्यास सोडला नाही. २०२१ मध्ये मातृत्वाची जबाबदारी आणि मुलीचे आजारपण असतानाही त्यांनी न डगमगता जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले.
**अपघातावर मात आणि यशाचे शिखर**
२०२३ मध्ये देसाईगंज येथे बदली झाल्यानंतर ममता यांना डिपार्टमेंटल PSI परीक्षेची संधी मिळाली. दुर्दैवाने, त्याच वेळी स्कूटर शिकताना पाय फ्रॅक्चर झाला. मात्र, या संकटाचे त्यांनी संधीत रूपांतर केले. मेडिकल रजेचा उपयोग करत त्यांनी ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. घरकाम, ड्युटी आणि लहान मुलीची जबाबदारी सांभाळत त्यांनी रात्री दीड-दीड वाजेपर्यंत अभ्यास केला.
या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. ३० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या मैदानी चाचणीत पायाला दुखापत असतानाही त्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून विक्रम केला. नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांतून महिला प्रवर्गातून निवड होणाऱ्या त्या एकमेव उमेदवार ठरल्या आहेत.
**ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा**
"शहरात गेल्याशिवाय यश मिळत नाही, हा ग्रामीण विद्यार्थ्यांचा गैरसमज आहे," असे ठामपणे सांगणाऱ्या ममता म्हणतात, "जर मनात जिद्द आणि चिकाटी असेल, तर घराच्या कोपऱ्यात बसूनही तुम्ही यशाचे शिखर गाठू शकता."
ममता यांच्या या यशात त्यांचे आई-वडील, पती, कन्या, देसाईगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. अजय जगताप साहेब आणि गावकरी यांचा मोलाचा वाटा आहे. दुर्गम भागातील एका साध्या मुलीचा हा पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी धडा घेण्यासारखा आहे.

Post a Comment
0 Comments