Type Here to Get Search Results !

लाखनी येथील पाणीपुरवठा योजनेला ३४.६१ कोटींची प्रशासकीय मंजूरी! आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्याला यश!


✍️ भवन लिल्हारे भंडारा गोंदीया जिल्हा प्रतिनिधी मो. नं.9373472847 /8888519894


भंडारा : लाखनी नगरपंचायत हद्दीतील पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ३४.६१ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाला अमृत २.० अभियानांतर्गत राज्य शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी नगरविकास मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. हे त्यांच्या प्रयत्नांचे यश मानले जात आहे.


केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत राज्यातील विविध नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण, सरोवरांचे पुनरुज्जीवन आणि हरित क्षेत्र विकासाची कामे हाती घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत लाखनी नगरपंचायतीच्या ३४.६१ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.


महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नागपूर विभागाने २५ सप्टेंबर २०२३ रोजी या प्रकल्पास तांत्रिक मान्यता दिली होती. त्यानंतर राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या ३ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीत प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार नगरविकास विभागाने शासन निर्णय जारी करून प्रशासकीय मान्यता दिली.

या प्रकल्पाची अंमलबजावणी लाखनी नगरपंचायत करणार असून प्रकल्पाचा कालावधी १२ महिने निश्चित करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाचा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेलाही नियमानुसार स्वतःचा हिस्सा उभारावा लागणार आहे. निविदा प्रक्रिया, तांत्रिक अटी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रकल्पाची अंमलबजावणी करणे बंधनकारक राहणार आहे.


लाखनी शहरातील नागरिकांना भविष्यात शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. प्रकल्पाची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी पुढेही सातत्याने पाठपुरावा करत राहू. - परिणय फुके, विधान परिषद सदस्य.

Post a Comment

0 Comments