Type Here to Get Search Results !

विष प्राशन करून आईमुलाची आत्महत्या केली

 



त्रिशा राऊत नागपूर जिल्हा क्राईम रिपोर्टर मो 9096817953



नागपूर.रेल्वेत लिपिक पदावर कार्यरत आई आणि मुलाने दुर्धर आजाराला कंटाळून टोकाचा निर्णय घेत विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.अभया अनंता खानखोजे (वय ५१) आणि अद्वैत अनंता खानखोजे ( वय ३२, रा. श्री गुरु माउली अपार्टमेंन्ट, महाल) असे मृत मायलेकांची नावे आहे. गेल्या महिन्याभरातील मायलेकांनी आत्महत्या केल्याची तिसरी घटना असल्याची माहिती समोर आली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभया खानखोजे या रेल्वेत तिकिट काऊंटरवर क्लार्क म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती अनंता खानखोजे हे रेल्वे खात्यात नोकरीला होते. त्यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर अभया या नोकरीवर लागल्या होत्या. त्यांना अद्वैत आणि यश अशी दोन मुले आहेत. यश हा अभियंता असून तो हैदराबाद शहरात इंफोसिस कंपनीत नोकरीला आहे. तर अद्वैत हा खासगी काम करीत होता. यश हा महिन्यातून एकदा घरी येत होता. गेल्या सात वर्षांपूर्वी अद्वैत याला ब्रेन ट्युमर आणि कर्करोग हा आजार झाला. तेव्हापासून तो अंथरुनाला खिळून होता. गेल्या दोन वर्षांपूर्वी अभया यांनाही कर्करोग झाला. तेव्हापासून त्यांनी मुलासह स्वत:ची काळजी घेण्यासाठी अभया यांनी घरी एक केअर टेकर ठेवला होता. तोच अद्वैतचा सांभाळ करायचा.मुलगा अद्वैत हा अंथरुणाला खिळला होता तर आई अभया यासुद्धा कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यामुळे दोघांनाही खूप कठिण परिस्थितीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे मायलेक खडतर असलेल्या आयुष्याला कंटाळले होते. त्यामुळे दोघांनी आयुष्य संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. दोघांनीही २० जुलै रोजी किटकनाशक आणले. मध्यरात्रीच्या सुमारास मायलेकांनी किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केली.हैदराबादला नोकरीवर असलेल्या यशने आईला फोन केला असता फोन उचलल्या गेला नाही. त्यानंतर त्याने भाऊ अद्वैतच्या मोबाईलवर फोन केला. आई आणि भावाने प्रतिसाद न दिल्यामुळे यश घाबरला. त्याने लगेच शेजारी राहणारे अभिषेक कळमकर आणि नातेवाईकांना फोन केला आणि घरी पाठवले. त्यानंतर मायलेक मृतावस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.आई आणि मुलगा आजाराला कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, त्यांनी सुसाईड नोट लिहिली. 'आता आम्ही आजाराला कंटाळलो आहे. त्यामुळे मायलेक आत्महत्या करतो आहे. आमच्या मृत्यूस कुणालाही जबाबदार धरु नका. स्वमर्जीने हा कठोर निर्णय घेत आहोत' असा सुसाईड नोटमध्ये उल्लेख होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Post a Comment

0 Comments