तळा किशोर पितळे- तळा प्रतिनिधी९०२८५५८५२९
पेण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मंडळ अधिकारी रविकांत जाधव यांना करण्यात आलेल्या अटकेचा निषेध करत रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच रवीकांत जाधव यांच्यावरील कारवाईचा फेरविचार करावा, अन्यथा जिल्हाभर बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण विश्वास पाटील व सरचिटणीस प्रवीण वरंडे यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यातआलेल्या निवेदनात दिला आहे.
मंडळ अधिकारी रविकांत जाधव यांनी शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून थेट अटक करण्यात आल्याचा निषेध करण्यात आला आहे.महाराष्ट्र जमीन महसूल संहिते नुसार महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या शासकीय कामकाजाबाबत कारवाई करण्यासाठी ठरावीक कायदेशीर प्रक्रिया असून तिचे पालन झाले नसल्याचा दावा संघटनेनेकेला आहे.संघटनेनेजिल्हाधिकाऱ्यांकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. रविकांत जाधव यांच्यावरील अटकेचा फेरविचार करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी आणि भविष्यात महसूल अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे थेट गुन्हे दाखल करून अटक करण्याच्या घटना टाळाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, २६ जुलै २०२६ रोजी दुपारपासून लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असून, मागण्यांची पूर्तता न झाल्यास २७ जुलै २०२६ पासून रायगड जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करतील,असा इशाराही संघटनेने दिला आहे.

Post a Comment
0 Comments