Type Here to Get Search Results !

पहिल्याच पावसात विवळवेढे उड्डाणपुलावर 'तळे'; महामार्गावरील प्रवाशांच्या जीवाशी पुन्हा खेळ

 



कोट्यवधींच्या काँक्रिटीकरणावर प्रश्नचिन्ह; विवळवेढे पुलावरील जलसाच्याने अपघाताचा धोका वाढला


अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755


मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे (महालक्ष्मी) येथील उड्डाणपुलावर पहिल्याच जोरदार पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मंगळवार (३० जून) मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसानंतर पुलाच्या मध्यभागी अक्षरशः तळे निर्माण झाले. त्यामुळे वाहनांची गती मंदावली असून, वाहतूक काही काळ विस्कळित झाली. गेल्या वर्षी याच ठिकाणी पाणी साचल्यामुळे गंभीर अपघात घडला होता. त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही कायमस्वरूपी सुधारणा न झाल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.


महामार्गाच्या काँक्रिटीकरण प्रकल्पांतर्गत सुमारे ७४० मीटर लांबीच्या या उड्डाणपुलावर डांबरी रस्त्यावर काँक्रीटचा थर टाकण्यात आला. मात्र, कामादरम्यान योग्य उतार (स्लोप) न दिल्याने पुलाच्या मध्यभागी खोलगट भाग तयार झाला. त्यातच पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या मोऱ्या (ड्रेनेज होल्स) काँक्रिटीकरणामुळे अंशतः बुजल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी पुलावरच साचत असल्याचे समोर आले आहे.


यामुळे पुलाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला असून, विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना धोका निर्माण होत आहे. भरधाव वेगातील वाहनांना पाण्याचा अंदाज न आल्यास भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


विशेष म्हणजे, गतवर्षीही पहिल्याच पावसात याच ठिकाणी पाणी साचले होते. त्यानंतर झालेल्या अपघातानंतर प्रशासनाने मोऱ्यांचा आकार वाढवून तात्पुरती उपाययोजना केली होती. मात्र, यंदा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याने संबंधित यंत्रणांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


सध्या महामार्ग पोलीस व स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलाच्या रचनेतील तांत्रिक त्रुटींची सखोल तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


पहिल्याच पावसाने उघड झालेल्या या त्रुटीमुळे कोट्यवधी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आणखी एखादा अपघात घडण्यापूर्वी संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करणे अत्यावश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments