अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
तवा–बऱ्हाणपूर गावाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग सध्या अतिशय धोकादायक बनला असून तवा ग्रामपंचायत हद्दीतील करविर फार्म हाऊसजवळ, ट्रान्सफॉर्मरलगत नाल्यावर बांधण्यात आलेल्या पुलामुळे पावसाच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पुलावरून तसेच रस्त्यावरून वाहत असून रस्त्याचा काही भाग खचला आहे. याचबरोबर रस्त्यालगत उभारलेला वीज ट्रान्सफॉर्मरही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सततच्या पावसामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून या ठिकाणी कधीही लहान-मोठा अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, प्रवासी तसेच रुग्णांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. तवा–बऱ्हाणपूर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ला जोडणारा महत्त्वाचा संपर्क रस्ता असल्याने बहुतांश नागरिक कासा, चारोटी, मनोर, डहाणू या बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात.
याशिवाय कासा उपजिल्हा रुग्णालय, तवा ग्रामीण रुग्णालय तसेच सोमटा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना, विशेषतः गरोदर महिला आणि आपत्कालीन रुग्णांना या धोकादायक मार्गामुळे मोठा फटका बसत आहे. रस्त्याची दुरवस्था आणि पावसामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेता प्रशासनाने तातडीने रस्त्याची डागडुजी, पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था आणि ट्रान्सफॉर्मरच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments