Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

तलासरीत पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; डहाणू–तलासरी परिसरात भीतीचे वातावरण




शनिवारनंतर मंगळवारी पुन्हा जमीन हादरली; डहाणू–तलासरीतील नागरिकांमध्ये घबराट

अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755

तलासरी : डहाणू–तलासरी तालुक्यात मंगळवारी दुपारी पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दुपारी १ वाजून ०९ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची रिक्टर स्केलवर ३.५ इतकी तीव्रता नोंदविण्यात आली. भूकंपाचे धक्के डहाणू व तलासरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाणवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.


यापूर्वी शनिवारी सकाळी १० वाजून ५७ मिनिटांनी देखील रिक्टर स्केलवर ३.१ तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला होता. त्या भूकंपाचा केंद्रबिंदू चारोटी परिसरात जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर असल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत पुन्हा भूकंप झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.


गेल्या सहा ते सात वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यांमध्ये वेळोवेळी सौम्य ते मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाची मालिका थांबली होती. मात्र शनिवार आणि त्यानंतर मंगळवारी पुन्हा धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक नागरिकांना घराबाहेर रात्र काढणेही शक्य नाही. त्यामुळे भूकंपाची भीती आणि पावसाचे संकट अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत असून नागरिक भयाच्या सावटाखाली दिवस काढत आहेत. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments