Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पावसात जीवघेणा ठरतो सुखडआंबा-चळणी पूल; संपर्क तुटल्याने ग्रामस्थांचे हाल




विद्यार्थी, गर्भवती महिलांसह शेतकरी संकटात; सुखडआंबा-चळणी येथे उंच व सुरक्षित पुलाची मागणी


अरविंद बेंडगा

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755

डहाणू :- डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सुखडआंबा-चळणी अंतर्गत हूंबाचापाडा येथील लहान पूल पावसाळ्यात दरवर्षी पाण्याखाली जात असल्याने ग्रामस्थांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत होत आहे. काही तासांच्या मुसळधार पावसानंतर पुलावरून वेगाने पाणी वाहू लागल्याने गावाचा बाहेरील भागाशी संपर्क तुटतो. परिणामी शालेय विद्यार्थी, गर्भवती महिला, रुग्ण, शेतकरी आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने ग्रामस्थांनी या ठिकाणी तातडीने उंच व सुरक्षित पूल उभारण्याची मागणी केली आहे.


पावसाळ्यात पुलावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाणे अत्यंत धोकादायक ठरते. अनेकदा वाहतुकीचा मार्ग बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर आजारी रुग्ण व गर्भवती महिलांना वेळेवर रुग्णालयात पोहोचविणे अशक्य होत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत जीविताला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


या समस्येचा फटका शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. शेतीची कामे, कृषी मालाची वाहतूक तसेच दैनंदिन व्यवहारांसाठी नागरिकांना बँका, बाजारपेठ, शासकीय कार्यालये व इतर अत्यावश्यक ठिकाणी जाणे कठीण होत आहे. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत गावाचा संपर्क तुटत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.


ग्रामस्थांच्या मते, ही समस्या नवीन नसून अनेक वर्षांपासून कायम आहे. प्रत्येक पावसाळ्यात प्रशासनाकडे मागणी करूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी उंच, मजबूत व सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित वाहतुकीसाठी सक्षम असा नवीन पूल तातडीने उभारण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक निधी उपलब्ध करून नवीन पुलाच्या उभारणीची कार्यवाही हाती घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

कोट :"सुखडआंबा-चळणी (हूंबाचापाडा) येथील पूल पावसाळ्यात वारंवार पाण्याखाली जात असल्याने विद्यार्थी, गर्भवती महिला, शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर उंच व सुरक्षित पूल बांधण्यात यावा, अशी आमची प्रशासनाकडे ठाम मागणी आहे."

 सरिता भोये, सरपंच, ग्रामपंचायत सुखडआंबा-चळणी

Post a Comment

0 Comments