Type Here to Get Search Results !

भूमिसेना / आदिवासी एकता परिषद, माहीम शाखेतर्फे दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गौरव सोहळा संपन्न




अरविंद बेंडगा

पालघर जिल्हा प्रतिनिधी

7798185755


माहीम :- दि. १९ जुलै : भूमिसेना / आदिवासी एकता परिषद, माहीम शाखेच्या वतीने सन २०२५-२६ मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या माहीम पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ माहीम ग्रामपंचायत माजी मार्केट सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा बाबा, आमदार मा. राजेंद्र गावित, सरपंच सौ. प्रिती पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध युट्युब कलाकार महेश बेलकर व अरविंद बेंडगा यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षणावर भर न देता सामाजिक ज्ञान, व्यवहारज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास तसेच शिक्षणासोबत विविध कौशल्ये (Skills) आत्मसात करण्याचे महत्त्व पटवून दिले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करून स्वावलंबी बनावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पद्मश्री माननीय भिकल्या लाडक्या धिंडा बाबा यांची उपस्थिती. त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडत चिकाटी, मेहनत, संस्कृतीचे जतन आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या साध्या, ओघवत्या आणि प्रेरणादायी शब्दांनी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि नागरिक भारावून गेले.

प्रमुख अतिथी आमदार राजेंद्र गावित यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच पालकांनी मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाकडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भूमिसेना / आदिवासी एकता परिषद, माहीम शाखेचे निमंत्रक दत्ताराम करबट, जिल्हा उपाध्यक्षा निता काटकर, ॲड. जतीन वरठा, माहीम शाखाध्यक्ष गोपीनाथ चाकर, मुकेश करबट, कार्याध्यक्ष राहुल आहाडी, सचिव राधा वरखंडे, विनोद काटकर, अमोल रावते, दत्ता कोम, नितेश चौधरी, चंद्रकला भूतकडे, सपना वळवी, मनीषा वळवी, संजाली चाकर, मानसी रावते, उपसरपंच संदीप चव्हाण, विशाल गरुडे, रमेश गोरेकर तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या गौरव समारंभाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा केला. कार्यक्रम प्रेरणादायी, उत्साहपूर्ण आणि विद्यार्थ्यांना नवचैतन्य देणारा ठरला.

Post a Comment

0 Comments