Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

मुंबई,पुण्यात भरमसाठ पाऊस कोसळल्यानंतर महाराष्ट्रावरून ढग अचानक झाले गायब !



हवामाण शास्त्रज्ञही चक्रावले ! शेतकऱ्यांची वाढली कमालीची चिंता !


✍️ भवन लिल्हारे भंडारा गोंदिया जिल्हा प्रतिनिधी 📱मो.नं.9373472847 / 8888519894


भंडारा : ( दिनांक १० जुलै २०२६ )गेल्या ९ दिवसांपासून मुंबई, महाराष्ट्राच्या किनारपट्टी आणि गुजरातमध्ये पावसाने अक्षरशः तांडव केला होता. जलमय झालेल्या या भागांनंतर आता हवामानात एक धक्कादायक उलटफेर होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार, कोसळणारा मान्सून आता अचानक 'ब्रेक' घेणार असून पुन्हा उन्हाचे चटके बसू लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हवामान शास्त्रज्ञही चक्रावून गेले असून शेतकऱ्यांची चिंता कमालीची वाढली आहे.


*१० ते १५ जुलै दरम्यान पाऊस रुसणार; अल निनोची 'छाया'*


जुलै महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनने दमदार बॅटिंग करत जून महिन्यातील पावसाची तूट भरून काढली होती. मात्र, ही दिलासादायक बातमी फार काळ टिकणारी नाही. प्रशांत महासागरात सक्रिय होत असलेल्या 'अल निनो'मुळे मान्सूनच्या वेगाला अचानक खीळ बसणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १० जुलै ते १५ जुलै दरम्यान उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतासह महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण कमालीचे घटणार आहे. सध्या अरबी समुद्रात आणि उत्तर भारतात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा कमकुवत होऊन पुढे निघून गेल्यामुळे ढगांची दाटी विरळ झाली आहे. 


*खरीप पिकांवर आणि अन्नदात्यावर मोठे संकट*


जुलै महिन्याचा हा मध्य काळ शेतीसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. या काळात भात (धान), सोयाबीन, कापूस यांसारख्या प्रमुख खरीप पिकांची लावणी आणि सुरुवातीची वाढ होत असते. पिकांच्या सुरुवातीच्या वाढीसाठी जमिनीत सतत ओलावा असणे गरजेचे आहे. पुढील ५ दिवस पाऊस पूर्णपणे गायब झाल्यास, ज्या भागात सिंचनाची सोय नाही अशा कोरडवाहू शेतातील कोवळी पिके करपून जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.


अल निनोचा नेमका खेळ काय?

हवामान तज्ज्ञांच्या मते, अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून एकाच दमात पडण्याऐवजी तुकड्या-तुकड्यांमध्ये पडतो. म्हणजे काही दिवस अतिवृष्टी होते आणि त्यानंतर सलग अनेक दिवस कडक ऊन किंवा कोरडा दुष्काळ पडतो. जुलैच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा दुसरा सक्रिय टप्पा येण्याची आशा असली, तरी तोपर्यंत शेतकऱ्यांना आभाळाकडे डोळे लावून बसावे लागणार आहे.

Post a Comment

0 Comments