अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
पालघर, दि. ८ जुलै : पालघर तालुक्यातील सोमटा-धिंडापाडा येथील रहिवासी श्री. कृष्णा भुयाल यांच्या कुटुंबावर निसर्गाने मोठे संकट ओढवले आहे. दि. ६ जुलैच्या मध्यरात्री मुसळधार पाऊस आणि प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरावरील संपूर्ण पत्रे उडून गेली. क्षणात घर उघड्यावर आले आणि मुसळधार पावसाचे पाणी घरात शिरल्याने घरातील कपडे, धान्य, भांडी तसेच दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंचे मोठे नुकसान झाले.
श्री. कृष्णा भुयाल यांचे कुटुंब अत्यंत गरीब असून रोजच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीत घराचे छप्पर उडाल्याने त्यांच्यासमोर राहण्याबरोबरच अन्न, कपडे आणि मुलांच्या शिक्षणाचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला.
या संकटाची माहिती मिळताच दि. ८ जुलै २०२६ रोजी "यारी दोस्ती ग्रुप, पालघर" यांनी सामाजिक बांधिलकी जपत तातडीने मदतीचा हात पुढे केला. ग्रुपच्या वतीने कुटुंबाला किराणा सामान, तांदूळ, विविध प्रकारच्या डाळी, खाद्यतेल, मसाले, जीवनावश्यक वस्तू, छत्र्या तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पेन, वह्या आणि इतर आवश्यक साहित्य देण्यात आले. या मदतीमुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
यावेळी जयेंद्र धांगडा, विजय तांबडा, सदू गुहे, सुनिल करबट, अंकेश करबट आणि अजित करबट यांनी प्रत्यक्ष कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला व भविष्यातही आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
निसर्गाच्या एका तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या या गरीब कुटुंबासाठी समाजातून पुढे आलेली ही मदत मानवतेचे जिवंत उदाहरण ठरली आहे. अशा संकटग्रस्त कुटुंबांना प्रशासनानेही तातडीने आर्थिक मदत, घर दुरुस्तीसाठी सहाय्य आणि आवश्यक शासकीय योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments