✍️ दिलीप करकरे ✍️
माणगाव, रायगड
7208708456
माणगाव:- निःस्वार्थ समाजसेवा, जनहिताची अखंड तळमळ आणि समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन वाटचाल करण्याच्या ध्येयाने कार्य करणारे माणगाव तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते राकेश तुपट यांना मुंबई येथील श्री पानबुडी देवी कलामंच यांच्या वतीने प्रतिष्ठेचा 'समाजरत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे माणगाव तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून सर्वत्र अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समाजकार्यातील प्रामाणिकपणा, गरजूंच्या मदतीसाठी धावून जाण्याची वृत्ती, युवकांना विधायक कार्यासाठी प्रेरित करण्याची धडपड आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे राकेश तुपट यांनी अल्पावधीतच समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संकटाच्या काळातही समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुंबई येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांना 'समाजरत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा गौरव आपल्या कुटुंबीयांचा, सहकाऱ्यांचा आणि समाजातील प्रत्येक हितचिंतकाचा असल्याची भावना व्यक्त करत, भविष्यातही अधिक जोमाने समाजसेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सन्मानाची बातमी माणगाव तालुक्यात पोहोचताच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या राकेश तुपट यांच्या कार्याचा हा गौरव संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
समाजासाठी झटणाऱ्या हातांचा सन्मान म्हणजे समाजमूल्यांचा सन्मान असतो. राकेश तुपट यांना मिळालेला 'समाजरत्न पुरस्कार' हा केवळ एका व्यक्तीच्या कार्याचा गौरव नसून माणगाव तालुक्यातील समाजसेवेच्या संस्कारांचा आणि जनतेच्या विश्वासाचा गौरव असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments