Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

तलासरीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा




अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी 

7798185755

तलासरी : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जागतिक आदिवासी दिन उत्सव मंच, तलासरी-डहाणू यांच्या वतीने आणि आदिवासी कृतज्ञ समाज बहुउद्देशीय संस्था, तलासरी यांच्या सौजन्याने ९ ऑगस्ट रोजी तलासरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदिवासी संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात वाघदेवाच्या आरतीने व तांदळाच्या पुंजल्याने पूजन करून करण्यात आली. ढोल-तारपा, सांगड तारपा आणि गौरी नृत्याच्या तालावर आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य सादर केले.

यंदाच्या ‘आदिवासी पारंपरिक सोयिनींचा सन्मान व जीवनकल्याणाचे रक्षण’ या संकल्पनेनुसार आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या ४० आदिवासी सोयिनींचा मायेचे लुगडे व एक किलो साखर देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला तहसीलदार अमोल पाठक, PSI अजय गोराडे आणि DSP जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजक सुनील इभाड, वसंत भसरा, सुरेश पऱ्हेड, विजय घोरखना, संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय कोम यांच्यासह पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ॲड. बालसी यांनी आदिवासी समाजाच्या हक्क व अधिकारांबाबत प्रबोधन केले. वसंत भसरा यांनी ‘आजचा युवा एक रक्षक’ या विषयावर मार्गदर्शन केले. वृषाली धोडी, सचिन ठेमका, रमेश काचरा, काजल रावते व इतर कलाकारांच्या गायनाने कार्यक्रमाला रंगत आणली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश हलका, संजय उंबरसाडा व सविता शिंगडा यांनी केले. कार्यक्रमाचे शूटिंग व रील निर्मिती अरविंद बेंडगा यांनी केली. पारंपरिक संस्कृतीचे जतन, आरोग्यसेवेतील योगदानाचा सन्मान आणि युवा पिढीमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments