Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

दैनिक देशोन्नती व मनस्वीनी वर्धापन दिन सोहळ्यात माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती.



मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

गडचिरोली : दैनिक देशोन्नतीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच मनस्वीनी पुरवणीच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपस्थित राहून दैनिक देशोन्नतीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

यावेळी दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, गडचिरोली आवृत्तीचे जिल्हाप्रतिनिधी प्रा. अनिल धामोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बोरकुटे यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी दैनिक देशोन्नतीच्या २२ वर्षांच्या वाटचालीचे कौतुक करताना, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम देशोन्नतीने केले असल्याचे सांगितले. ग्रामीण, आदिवासी तसेच दुर्गम भागातील जनतेच्या समस्या प्रशासन आणि शासनापर्यंत पोहोचविण्यात वृत्तपत्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ही जबाबदारी दैनिक देशोन्नतीने सातत्याने पार पाडली असल्याचे त्यांनी नमूद केले.

निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेचे कौतुक

दैनिक देशोन्नतीची निर्भीड, निष्पक्ष आणि लोकाभिमुख पत्रकारिता ही विशेष उल्लेखनीय असल्याचे माजी आमदार डॉ. होळी यांनी सांगितले. कोणत्याही दबावाला बळी न पडता जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत वास्तव परिस्थिती समाजासमोर मांडण्याचे काम देशोन्नती करत आहे. विशेषतः गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांना सातत्याने प्रसिद्धी देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वृत्तपत्राने केले आहे, असे त्यांनी गौरवोद्गार काढले.

‘मनस्वीनी’ पुरवणीचेही कौतुक.

दैनिक देशोन्नतीच्या मनस्वीनी या पुरवणीच्या चार वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दलही माजी आमदार डॉ. होळी यांनी शुभेच्छा दिल्या. महिलांचे कर्तृत्व, संघर्ष, आत्मविश्वास, सामाजिक योगदान आणि विविध क्षेत्रांतील यश अधोरेखित करणारी मनस्वीनी ही पुरवणी महिलांना प्रेरणा देणारे व्यासपीठ ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजातील सकारात्मक परिवर्तनासाठी पत्रकारिता आणि सामाजिक जाणीव यांचा समन्वय आवश्यक असून, दैनिक देशोन्नतीने भविष्यातही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अधिक सक्षमपणे कार्य करावे, अशी अपेक्षा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केली.

यावेळी दैनिक देशोन्नतीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच मनस्वीनीच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुख्य संपादक प्रकाश पोहरे, जिल्हाप्रतिनिधी प्रा. अनिल धामोडे व संपूर्ण देशोन्नती परिवारास शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments