Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

भामरागड तालुक्यातील विसामुंडीच्या वीज समस्यांवर CPI ची महावितरण कडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 

भामरागड :- तालुका भामरागड बोटंनफुंडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विसामुंडी गावातील विविध समस्यांबाबत ग्रामस्थांनी बैठक आयोजित करून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) पदाधिकाऱ्यांना गावात बोलावून समस्या मांडल्या. यामध्ये प्रमुख समस्या म्हणून गावातील वीजपुरवठ्याचा प्रश्न ग्रामस्थांनी मांडला.

गावात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, विद्युत लाईनची नियमित देखभाल-दुरुस्ती केली जात नसल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाईनमन नियमितपणे गावात येऊन विद्युत यंत्रणेची पाहणी व देखभाल करत नसल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे गावात नियमित लाईनमनची सेवा उपलब्ध करून देऊन वीज यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच मीटरचे नियमित रीडिंग घेऊनच वीज बिल देण्यात यावे. प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता अंदाजे वीज बिल देण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गावातील वीजपुरवठा सक्षम करण्यासाठी ट्री-फेज वीज सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत CPI जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन देऊन विसामुंडी गावातील वीज समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.

दुर्गम भागातील ग्रामस्थांना नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळणे आवश्यक असून, महावितरण विभागाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन प्रत्यक्ष कार्यवाही करावी. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कॉ. सचिन मोतकुरवार यांनी दिला.

CPI जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, कॉ. सुरज जककुलवार व सरपंच दुलसा मडावी यांच्या उपस्थितीत समस्त गावकऱ्यांची बैठक पार पडली.

Post a Comment

0 Comments