मंगेश म्हस्कर यांचा विद्यार्थ्यांना मेहनत, जिद्द आणि शिक्षणातून यश मिळविण्याचा प्रेरणादायी संदेश
✍️ दिलीप करकरे ✍️
माणगाव, रायगड
7208708456
माणगाव, रायगड : महाराष्ट्र SSC बोर्डाच्या सन १९८८ च्या परीक्षेत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे तसेच साता समुद्रापार आपल्या यशाचा झेंडा फडकविणारे आदरणीय श्री. मंगेश तुकाराम म्हस्कर साहेब यांनी माणगाव येथील भारतीय सैनिक श्री. सचिन तुकाराम दसवते साहेब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे दसवते कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला.
सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले श्री. मंगेशजी म्हस्कर साहेब आजही आपल्या मातीतल्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल सकारात्मक विचार बाळगून आहेत. अत्यल्प सुविधा उपलब्ध असतानाही जिद्द, मेहनत, चिकाटी आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी मिळविलेले शैक्षणिक यश आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन परिस्थितीवर मात करण्यासाठी मेहनत व कष्टाची कास धरावी, असा संदेश त्यांनी दिला. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करता येते, हा त्यांच्या जीवनप्रवासातून मिळणारा प्रेरणादायी संदेश आहे.
आजच्या मोबाईल आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांनी मोबाईलचा अतिरेक टाळून त्याचा उपयोग आवश्यक कामांसाठी तसेच ज्ञानवृद्धीसाठी करावा. माहिती-तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून भविष्यातील आव्हानांना धैर्याने सामोरे जावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मंगेशजी म्हस्कर यांचे कर्तृत्व आणि संघर्ष आजच्या तरुण पिढीसाठी आदर्शवत आहे. गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश संपादन करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
या सदिच्छा भेटीबद्दल श्री. सचिन तुकाराम दसवते यांनी श्री. मंगेशजी म्हस्कर यांचे मनःपूर्वक आभार मानले. कर्तृत्ववान, गुणवंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची आपल्या निवासस्थानी झालेली भेट ही आपल्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी अत्यंत आनंददायी, अभिमानास्पद आणि सदैव स्मरणात राहणारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
जिद्द, मेहनत आणि योग्य दिशेने केलेले प्रयत्न यशाचा मार्ग नक्कीच खुला करतात, हा प्रेरणादायी संदेश देणारी ही सदिच्छा भेट माणगावच्या सामाजिक व शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

Post a Comment
0 Comments