Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

माजी विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ; कोलमांडले प्राथमिक शाळेला संगणक संच भेट




✍️ दिलीप करकरे ✍️

माणगाव, रायगड 

7208708456

श्रीवर्धन:- कोलमांडले, ता. श्रीवर्धन ,आपण ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले, ज्या मातृसंस्थेने आपल्या जीवनाची भक्कम पायाभरणी केली, त्या शाळेच्या विकासासाठी योगदान देणे ही प्रत्येक माजी विद्यार्थ्याची सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, कोलमांडले येथील १९९८-९९ च्या माजी विद्यार्थी बॅचच्या वतीने शाळेला अद्ययावत संगणक संच सप्रेम भेट देण्यात आला.

शाळेतून बाहेर पडल्यानंतर अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी केवळ जुन्या आठवणींना उजाळा न देता आपल्या शाळेच्या प्रगतीसाठी ठोस योगदान देण्याचा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाची अधिक चांगली संधी मिळावी, तसेच डिजिटल शिक्षणाला चालना मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

“आपल्या जडणघडणीत ज्या शाळेचा मोठा वाटा आहे, त्या शाळेसाठी काहीतरी योगदान देता आले, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. आमच्या या छोट्याशा प्रयत्नातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी दिशा मिळेल,” अशी भावना १९९८-९९ च्या माजी विद्यार्थी बॅचच्या सदस्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी माजी विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी तसेच कोलमांडले गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी जपलेल्या या ऋणानुबंधाचे आणि सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांसह शाळा व्यवस्थापनाकडून भरभरून कौतुक करण्यात आले.

माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची अधिक चांगली संधी उपलब्ध होणार असून, “शाळेने दिलेले संस्कार आणि ज्ञान समाजाला परत देणे” या सामाजिक भावनेचा प्रेरणादायी आदर्श कोलमांडले गावात निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments