✍️श्री.निलेश सोनवणे✍️
नवी मुंबई : राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक प्रश्न आणि कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे ‘जन आक्रोश आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे.
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, दलित वस्ती सुधार निधीच्या खर्चाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, सर्व मंजुरी, खर्चाचा तपशील तसेच मेजरमेंट बुक सार्वजनिक करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करावीत आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशीही मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
याशिवाय अय्यप्पा झोपडपट्टीतील विकासकामे, दलित वस्ती सुधार निधी आणि नवी मुंबई महानगरपालिकेतील कथित गैरव्यवहार या मुद्द्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. दलित वस्त्यांमधील मूलभूत सुविधा, रोजगार आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांवर प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे.
या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रीय दलित पँथर, आंबेडकरी युवा समिती, राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल कल्याण परिषद, भीमराव सेना, जय भीम आर्मी, बहुजन समाज पार्टी यांच्यासह इतर सामाजिक संघटना व पक्षांचा समावेश आहे.
आंदोलनाचे नेतृत्व प्रियाताई सरोदे, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आणि राकेश लक्ष्मण मोहिते, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
“दलित समाजाच्या हक्कांचा निधी, मूलभूत सुविधा, सामाजिक न्याय आणि स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर प्रशासनाची जबाबदारी निश्चित करणे,” हा आंदोलनाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून संबंधित मागण्यांवर काय भूमिका घेतली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments