Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जी. आर. मेथा माध्यमिक विद्यालय, निजामपूर येथे २१० फळझाडांची वृक्षलागवड




✍️दिलीप करकरे ✍️

माणगाव, रायगड 

7208708456


माणगाव:-  पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जी. आर. मेथा माध्यमिक विद्यालय, निजामपूर येथे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून तब्बल २१० फळझाडे व विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती संपदा चंद्रकांत माहाळुंगे, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

हा वृक्षारोपण उपक्रम वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाचे निवृत्त अधिकारी श्री. सिताराम चंद्राबाई गंगाराम खाडे यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आला. त्यांच्या पर्यावरण संवर्धनातील उल्लेखनीय सेवेला अभिवादन म्हणून त्यांचे सुपुत्र श्री. संतोष संगीता सिताराम खाडे यांनी विद्यालयाला २१० झाडे भेट दिली.

विद्यालय परिसरात करंज, तुती, जांभूळ, काजू, आवळा, चिंच, साग, सिताफळ आदी विविध प्रजातींची झाडे विद्यार्थ्यांनी स्वतः मेहनत घेऊन लावली. वृक्षलागवडीसह त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्वीकारली.

यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती संपदा माहाळुंगे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.

रुग्णसेवा, समाजसेवा आणि आता वृक्षसेवा या त्रिसूत्रीचा आदर्श जपत "सेवेसी तत्पर खाडे परिवार" सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. आरोग्य, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही क्षेत्रांत कार्यरत असलेल्या खाडे परिवाराचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, पर्यावरण संवर्धनासाठी एक आदर्श पाऊल म्हणून परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments