विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931
एटापल्ली : जारावंडी परिसरात वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, आज पुन्हा वाघाने हल्ला करून जर्षि नावाच्या गायीला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जारावंडी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्याने पाळीव जनावरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे जंगलालगतच्या गावांतील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे
विशेष म्हणजे, सदर घटना जारावंडी येथील वन विभागाच्या कार्यालयापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर मक्याच्या शेतात घडल्याने वन विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वन विभागाचे कार्यालय इतक्या जवळ असतानाही वाघाने गावालगत येऊन पाळीव जनावरावर हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या घरांच्या आणि वस्तीच्या जवळच वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
यापूर्वीही जारावंडी परिसरात बैल, गायी, शेळ्या आदी पाळीव जनावरांवर वाघाकडून हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोलंदा येथे वाघाच्या हल्ल्यात मनुष्यबळी गेल्यानंतरही वाघाचा वावर कायम असल्याने नागरिकांमध्ये अधिकच भीती निर्माण झाली आहे. आता वाघ गावालगत आणि वन विभागाच्या कार्यालयापासून काही अंतरावर येत असल्याने नागरिकांनी वन विभागाने केवळ सतर्कतेचे आवाहन न करता प्रभावी आणि तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे
दरम्यान, पाळीव जनावरांवरील हल्ल्यांची मालिका थांबत नसल्याने पुढील धोका टाळण्यासाठी वन विभागाने वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वन्यप्राण्यांचा वावर नेमका कुठे आहे, त्यांची संख्या किती आहे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणती उपाययोजना करण्यात येत आहे, याबाबत वन विभागाने स्पष्ट माहिती द्यावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे
तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी
दरम्यान, सदर गाय दुधाळ असून तिच्या दुधाच्या विक्रीतून संबंधित कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र वाघाच्या हल्ल्यात दुधाळ गाय गमावल्याने कुटुंबाच्या उत्पन्नाचा मोठा आधारच हिरावला गेला असून त्यांच्या कुटुंबावर अचानक आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांकडून पाळीव जनावरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे होणारे नुकसान लक्षात घेता वन विभागाने सदर कुटुंबाची तातडीने पंचनामा करून नियमानुसार आर्थिक मदत व नुकसानभरपाई उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे

Post a Comment
0 Comments