Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

अंशुल स्पेशालिटी मॉलिक्युल्स प्रा. लि.च्या माध्यमातून ३ लाखांचा निधी; बंद पडलेली जलजीवन मिशन योजना पुन्हा सुरू होणार



✍️ दिलीप करकरे ✍️

   माणगाव, रायगड 

   7208708456

माणगाव : ग्रुप ग्रामपंचायत काकळ अंतर्गत येणाऱ्या काकळ आदिवासीवाडीतील गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनेला अखेर नवसंजीवनी मिळाली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाणीपुरवठा योजनेच्या सोलर पंपाच्या सोलर प्लेट्सवर मागील वर्षी वादळ-वाऱ्यादरम्यान मोठे झाड कोसळल्याने त्या मोडकळीस आल्या होत्या. त्यामुळे आदिवासीवाडीचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता.

पाणीपुरवठा बंद असल्याने आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायी चालत जाऊन डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत होते. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या गंभीर समस्येमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

ही बाब भाजपा तालुका सरचिटणीस किसनजी महाडिक, उपतालुका प्रमुख सुधीरजी म्हामुणकर, उपसरपंच सौ. शुभांगी म्हामुणकर, श्री. अशोक कान्हेरे व श्री. विजय लाड यांनी माजी पंचायत समिती सदस्या तथा भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. रचना निलेश थोरे यांच्या निदर्शनास आणून दिली.

शासकीय निधी उपलब्ध होत नसल्याने सौ. रचना थोरे यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा करत लायन्स क्लबचे रायगड डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला. संजीव सूर्यवंशी यांच्याकडे पाणीप्रश्न मांडला. त्यानंतर ला. संजीव सूर्यवंशी यांनी मे. अंशुल स्पेशालिटी मॉलिक्युल्स प्रा. लि. या कंपनीकडे आवश्यक सोलर प्लेट्स व इतर साहित्य उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

कंपनीनेही सामाजिक बांधिलकी जपत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि तातडीने आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. संस्थेच्या माध्यमातून तब्बल ३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने बंद पडलेली जलजीवन मिशन योजना पुन्हा कार्यान्वित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

या कामामुळे काकळ आदिवासीवाडीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आदिवासीवाडीचे अध्यक्ष रमेश जाधव, सुरेश जाधव, धोंडू जाधव, माजी सरपंच विठ्ठल जाधव, गणपत जाधव यांच्यासह सर्व आदिवासी बांधवांनी संबंधितांचे आभार मानले.

यावेळी आदिवासी बांधवांनी सांगितले की, “गेल्या वर्षभरापासून आम्ही पाण्यासाठी वणवण करत होतो. अनेक पक्षांचे पुढारी वाडीमध्ये येऊन आश्वासने देऊन गेले; मात्र प्रत्यक्ष काम कुणीही केले नाही. निलेश थोरे व रचना ताई यांच्या माध्यमातून आजवर आमच्या भागात अनेक विकासकामे झाली असून ते सदैव आमच्या पाठीशी उभे राहतात.” त्यामुळे यापुढेही त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार आदिवासी बांधवांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे म्हणाले, “निवडणुका होऊन गेल्या म्हणजे राजकारण संपले; परंतु जनतेशी असलेली बांधिलकी आम्ही सोडलेली नाही. प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, अडीअडचणीच्या काळात मार्ग काढणे आणि प्रत्येक व्यक्तीला आपले कुटुंब समजणे, हेच भाजपचे संस्कार आहेत.”

अंशुल स्पेशालिटी मॉलिक्युल्स प्रा. लि. कंपनीने अत्यंत गरजेचा असलेला पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी कंपनीचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच सतत पाठपुरावा करणारे ला. संजीव सूर्यवंशी यांचेही विशेष आभार व्यक्त केले. यापुढेही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून परिसरातील प्रत्येक गावातील जनतेचे प्रश्न विकासकामांच्या माध्यमातून सोडवत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पंप हाऊससाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सचिन लाड यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. रिकामे, सौ. अश्विनी कान्हेरे, श्री. जितेंद्र पवार, श्री. हवालदार, काकळ गावचे श्री. आनंद लाड, श्री. माने, श्री. शिवाजी जाधव, श्री. व सौ. धनराज येलवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच लायन्स क्लब ऑफ माणगावचे ला. संदीप नागे, ला. विनायक तेटगुरे, ला. अमोल पवार, ला. मोहिते, ला. अजय मोरे यांच्यासह मान्यवरांचेही आभार मानण्यात आले.

वर्षभरापासून पाण्यासाठी सुरू असलेल्या आदिवासी बांधवांच्या संघर्षाला आता पूर्णविराम मिळण्याची आशा निर्माण झाली असून, जलजीवन मिशनच्या माध्यमातून काकळ आदिवासीवाडीतील घराघरात पुन्हा पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Post a Comment

0 Comments