अरविंद बेंडगापालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
तलासरी, दि. २ ऑगस्ट : तलासरी व डहाणू परिसरातील आदिवासी समाजातर्फे ९ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. समाजबांधव, विविध मित्र मंडळे, युवक संघटना आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होणार असून, आदिवासी संस्कृती, परंपरा आणि एकतेचा संदेश देण्याचा निर्धार करण्यात आला.
बैठकीत ठरलेल्या कार्यक्रमानुसार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता प्रत्येक पाड्यात वाघोबा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजेपर्यंत सर्व सहभागी तलासरी बस डेपो येथे बाइक रॅलीद्वारे एकत्र येतील. तेथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून नाश्त्यानंतर सकाळी १०.३० वाजता मुख्य कार्यक्रमास प्रारंभ होईल.
कार्यक्रमात मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्यात येणार असून, विविध वक्त्यांकडून आदिवासी समाजाचे हक्क, शिक्षण, संस्कृती, सामाजिक विकास आणि प्रबोधनपर विषयांवर मार्गदर्शन केले जाईल. तसेच आदिवासी कलाकारांकडून पारंपरिक कला सादर करण्यात येणार आहेत. यावर्षी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) संकल्पनेनुसार विविध गावांतील महिलांचा विशेष सत्कारही करण्यात येणार आहे.
यावेळी ढोल, तारपा, ढोल-ताशे, ऑर्केस्ट्रा, डीजे, गौरी नृत्य, पारंपरिक लोकनृत्य तसेच रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषांमधील सांस्कृतिक मिरवणुकीद्वारे आदिवासी संस्कृतीचे वैभव अनुभवायला मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी नवजीवन युवा मित्र मंडळ, प्रगती ग्रुप, अष्टविनायक मित्र मंडळ तसेच गोवरसेत पाडा, लाखनपाडा, वेडगपाडा, कोकाटपाडा, काकडपाडा, पातीलपाडा, डोंगरिपाडा, डोंगरपाडा, सायवन, आंबेसरी, हळदपाडा, रायपूर, वेवजी, सवरोली, काजळी, कोचाई, उपलाट आणि तलासरी-डहाणू तालुक्यातील अनेक गावांतील मित्र मंडळांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी समाजाच्या अस्मिता, संस्कृती, परंपरा आणि हक्कांचे प्रतीक असल्याने हा दिवस मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि एकतेचा संदेश देत साजरा करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments