मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
मडवेली (दि. २८ ऑगस्ट २०२६):- येथील ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख असलेल्या गोटूल भूमी मडवेली येथे आज ‘सैला कोलंग गोंगो’ व पारंपरिक नृत्य महोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला आदिवासी समाज बांधवांची उत्स्फूर्त व लक्षणीय उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे आगमन होताच पारंपरिक वाद्य आणि मनमोहक लोकनृत्याच्या तालावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजराने आणि पारंपरिक वेशभूषेने संपूर्ण परिसर निनादून गेला होता.
उपस्थित पाहुण्यांनी उपस्थितांना संबोधित करताना ‘सैला कोलंग गोंगो’ या पारंपरिक उत्सवाचे महत्त्व, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि निसर्गपूजेशी जोडलेली समृद्ध आदिवासी संस्कृती याविषयी सविस्तर माहिती दिली. आपली मूळ संस्कृती, परंपरा आणि रूढी-परंपरांचे जतन करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन या वेळी मान्यवरांनी केले.
या सोहळ्यात सादर झालेल्या पारंपरिक सैला व कोलंग नृत्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment
0 Comments