Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पेंदुलवाही–गोटीनवाडा रस्त्यासाठी CPI चे तहसीलदारांना निवेदन



मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016

एटापल्ली : - ग्रामपंचायत कोहका अंतर्गत पेंदुलवाही ते गोटीनवाडा (छत्तीसगड सीमा) या मार्गावर मातीमुरूम रस्ता मंजूर करून तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने एटापल्लीचे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

पेंदुलवाही गावातील नागरिकांनी गावात बैठक घेऊन या मार्गाची गंभीर समस्या मांडली. या बैठकीस भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी पेंदुलवाही ते गोटीनवाडा (छत्तीसगड सीमा) या मार्गावर रस्ता नसल्यामुळे होत असलेल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. नागरिकांनी या मार्गावर मातीमुरूम रस्ता मंजूर करून देण्याची मागणी केली.

सदर मार्ग सध्या केवळ जंगलातील पायवाट स्वरूपात असून या परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागातील नागरिकांचे रोटी-बेटीचे संबंध, दैनंदिन बाजारपेठ, आरोग्यसेवा, शिक्षण तसेच इतर मूलभूत गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर छत्तीसगड राज्यावर अवलंबून राहावे लागते.

रस्ता नसल्यामुळे नागरिकांना जंगलातील पायवाटेने प्रवास करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात मार्गाची परिस्थिती अत्यंत बिकट होते. आजारी व्यक्तींना उपचारासाठी नेणे, विद्यार्थ्यांची ये-जा, बाजारपेठेत जाणे तसेच नातेवाईकांशी संपर्क ठेवणे कठीण होते.

यावेळी CPI जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “गावकऱ्यांनी बैठकीत मांडलेली समस्या अत्यंत गंभीर आहे. पेंदुलवाही ते गोटीनवाडा हा मार्ग या भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असून रस्ता नसल्यामुळे नागरिकांना आजही जंगलातील पायवाटेवरून प्रवास करावा लागत आहे. आरोग्य, शिक्षण, बाजारपेठ आणि सामाजिक संबंधांसाठी छत्तीसगडवर अवलंबून असलेल्या नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने पाहून तातडीने मार्गाची पाहणी करावी, मातीमुरूम रस्त्याला मंजुरी द्यावी आणि प्रत्यक्ष काम सुरू करावे. नागरिकांच्या मूलभूत दळणवळणाच्या सुविधेसाठी CPI या प्रश्नाचा पाठपुरावा करेल.”

CPI च्या वतीने पेंदुलवाही ते गोटीनवाडा मार्गाची तातडीने पाहणी करून मातीमुरूम रस्त्याला अधिकृत मंजुरी द्यावी, आवश्यक वन व महसूल विभागाच्या परवानग्या आणि शासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्यात तसेच प्रत्यक्ष रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. भविष्यात या रस्त्याचे मजबुतीकरण करून आवश्यकतेनुसार डांबरीकरण करावे, अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, कॉ. सुरज जककुलवार, जिल्हा सदस्य, कॉ. तेजराम गव्हारे, AIYF चामोर्शी तसेच पेंदुलवाहीचे गाव पाटील, गावकरी आणि पार्टी कार्यकर्ते उपस्थित होते.

गावकऱ्यांनी मांडलेल्या या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन पेंदुलवाही ते गोटीनवाडा (छत्तीसगड सीमा) मातीमुरूम रस्त्याला मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी ठाम मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टीने केली आहे.

Post a Comment

0 Comments