Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

कला-संस्कृतीपासून पर्यावरण संवर्धनापर्यंत; १०० गुणांच्या निकषांवर मंडळांचे मूल्यमापन



प्रमोद चिंतलवार तालुका प्रतिनिधी गडचिरोली 

 मो. नं. 9405133420

गडचिरोली : राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार असून पात्र मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी, प्रसाद घाडगे यांनी केले आहे.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या १७ ऑगस्ट २०२६ च्या शासन निर्णयानुसार ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत अथवा स्थानिक पोलीस किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभागी होता येईल.

स्पर्धेसाठी कला जतन व संवर्धन, संस्कृतीचे जतन व संवर्धन, निसर्ग व सार्वजनिक संपत्तीचे जतन-संवर्धन, सामाजिक कार्य आणि गणेशोत्सव आयोजनातील विधायकता असे पाच प्रमुख निकष निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक निकषासाठी २० याप्रमाणे एकूण १०० गुणांचे मूल्यमापन होणार आहे.

गायन, वादन, नृत्य, नाट्य, पोवाडा, लावणी, झाडीपट्टी, चित्रकला, शिल्पकला यांसह विविध कला व लुप्त होत असलेल्या कलांच्या संवर्धनासाठी राबविलेले उपक्रम विचारात घेतले जातील. तसेच कवी संमेलने, पुस्तक मेळावे, वक्तृत्व व निबंध स्पर्धा, पारंपरिक खेळ, ग्रंथालये आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या उपक्रमांनाही गुण दिले जातील.

वन व निसर्ग संवर्धन, गड-किल्ले व स्मारकांचे जतन, स्वच्छता आणि पर्यटनविषयक जनजागृतीबरोबरच महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व वंचित घटकांसाठी केलेले सामाजिक कार्यही मूल्यमापनात महत्त्वाचे ठरणार आहे. आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कृषी, विज्ञान, समाजसुधारणा तसेच अंधश्रद्धा व अनिष्ट रूढींविरोधातील प्रबोधनात्मक उपक्रमांचाही विचार केला जाणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व सजावट, प्रदूषणमुक्त परिसर, स्वच्छता, भाविकांसाठी पाणी व प्रथमोपचार सुविधा, आयोजनातील शिस्त आणि ‘एक गाव-एक गणपती’ यांसारख्या विधायक उपक्रमांना विशेष महत्त्व राहणार आहे. मंडळाच्या कार्यकारिणीत किमान ३० टक्के महिला प्रतिनिधित्व असण्याचाही मूल्यमापनात विचार केला जाईल.

पोर्टलवर अर्ज सादर करावा

पात्र मंडळांनी ganeshostav.pldmka.co.in या पोर्टलवर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावा. स्पर्धेचे समन्वयक म्हणून संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी काम पाहणार आहेत. मंडळांच्या कार्याचे मूल्यमापन मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशीपासून चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशीपर्यंतच्या कालावधीतील कामाच्या आधारे केले जाईल.

मागील सलग दोन वर्षांत राज्यस्तरीय अथवा जिल्हास्तरीय पारितोषिक मिळालेली मंडळे यंदाच्या पारितोषिकासाठी पात्र ठरणार नाहीत. निवड समितीने निश्चित केलेल्या वेळी आवश्यक कागदपत्रे व माहिती सादर करणे संबंधित मंडळाला बंधनकारक राहील. तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय निवड समितीचा निर्णय अंतिम राहणार आहे.

एखाद्या मंडळाची एकापेक्षा अधिक स्तरांवर पुरस्कारासाठी निवड झाल्यास त्याला सर्वोच्च स्तरावरील पुरस्काराचीच रक्कम दिली जाईल.

स्पर्धेच्या सविस्तर माहितीसाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा शासन निर्णय क्र. पुलदे-२०२५/प्र.क्र.११५/सां.का.२, दि. १७ ऑगस्ट २०२६ पाहावा, असे जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments