Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

खाणी सुरू करण्याची घाई, मात्र विकास हरवला; मेढरीच्या रस्त्यासाठी भाकप आक्रमक




विश्वनाथ जांभुळकर 

एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो 9421856931


एटापल्ली : -ग्रामपंचायत जवेली बुज अंतर्गत मेढरी गावाला आजही पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावाला जाण्यासाठी सध्या जंगलवाटेचा वापर करावा लागत असून पावसाळ्यात ओढे-नाले भरून वाहत असल्याने गावाचा मुख्य मार्गाशी संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण होते.


मेढरी गावातील नागरिकांनी आपली ही समस्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गडचिरोली जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या निदर्शनास आणून देत या विषयावर लक्ष देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. नागरिकांच्या मागणीची दखल घेत कॉ. मोतकुरवार यांनी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना तहसीलदार, एटापल्ली यांच्या मार्फत निवेदन देऊन मेढरी गावाला पक्का रस्ता तसेच आवश्यक ठिकाणी पूल मंजूर करून बांधकाम करण्याची मागणी केली.


कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “एटापल्ली तालुक्यात अनेक खाणी सुरू करण्याची घाई केली जात आहे; मात्र दुसरीकडे ग्रामीण आणि दुर्गम भागातील मूलभूत विकासाचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. खाणी सुरू करण्याची घाई असलेल्या या तालुक्यात विकास मात्र हरवला आहे. मेढरीसारख्या गावाला आजही पक्का रस्ता मिळत नसेल, तर विकासाचा नेमका फायदा कोणाला होत आहे, हा प्रश्न प्रशासनाने आणि शासनाने स्वतःला विचारण्याची गरज आहे.”


“पावसाळ्यात जंगलवाट चिखलमय होते, अनेक ठिकाणी पाणी साचते आणि ओढे-नाले भरून वाहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे, रुग्णांना रुग्णालयात नेणे, शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक करणे तसेच नागरिकांना बाजारपेठ व शासकीय कार्यालयांमध्ये जाणे अत्यंत कठीण होते. एकीकडे खाण प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्याची चर्चा केली जाते, मात्र स्थानिक नागरिकांना साधा पक्का रस्ता मिळत नाही, ही गंभीर बाब आहे.”


मेढरी गावाला जोडणाऱ्या जंगलवाटेचे तातडीने सर्वेक्षण करून पक्का रस्ता मंजूर करावा, रस्त्याचे तांत्रिक अंदाजपत्रक तयार करून संबंधित शासकीय योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच मार्गातील ओढे, नाले व पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी पूल, उच्चस्तरीय पूल व मोऱ्या बांधण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.


पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम तातडीने सुरू करून मेढरी गावाचा वर्षभर वाहतूक संपर्क कायम राहील, याची व्यवस्था करावी. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने स्थळ पाहणी करण्याचे आदेश देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाला देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.


“मेढरी गावातील नागरिकांना सुरक्षित आणि वर्षभर चालणारा रस्ता मिळणे हा त्यांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे. प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम सुरू करावे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा कॉ. सचिन मोतकुरवार यांनी दिला.


निवेदन देताना भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार तसेच मेढरी गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments