Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील गणेशभक्तांना आवाहन

प्रमोद एन.चिंतलवार 

तालुका प्रतिनिधी गडचिरोली 

मो. नं. 9405133420


गडचिरोली : परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. पारंपरिक पद्धतींचा आदर राखत पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


गणेश चतुर्थीच्या मंगलमय मुहूर्तावर मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सहकुटुंब पारंपरिक पद्धतीने बाप्पाची पूजा-अर्चा करून आरती केली.


यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील तसेच देशभरातील गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विघ्नहर्त्याने सर्वांच्या जीवनातील विघ्ने दूर करून आनंद, नवचैतन्य, सामर्थ्य आणि समृद्धी प्रदान करावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. देश, राज्य, नागरिक तसेच बळीराजासमोरील अडचणी दूर व्हाव्यात, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.


मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे. गणेशोत्सव हा श्रद्धा, आनंद आणि परंपरेचा उत्सव असून सर्व गणेशभक्तांनी तो भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा करावा. मात्र, उत्सवाच्या आनंदासोबत पर्यावरणाचे भान राखणेही तितकेच आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून समाजाला एकत्र आणणारा आणि भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकीची भावना दृढ करणारा उत्सव आहे. त्यामुळे परंपरेचे जतन, पर्यावरणाचे संरक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांचा समन्वय साधत सर्वांनी पर्यावरणपूरक व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Post a Comment

0 Comments