Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

मासवण आश्रमशाळा प्रकरणी आंदोलनाच्या मागण्यांना यश; संबंधितांवर गुन्हे, निलंबनाची कारवाई



अरविंद बेंडगा 

जिल्हा प्रतिनिधी पालघर 

7798185755

पालघर, १ सप्टेंबर २०२६ :- मासवण येथील आश्रमशाळेत दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर सुरू असलेल्या सामाजिक आंदोलनाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्यासह विविध मागण्यांबाबत प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आले आहे. सामाजिक आंदोलन ही समाजाप्रती असलेली जबाबदारी असून, ही जबाबदारी कधीही संपत नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणी आदिवासी सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे (रा. विक्रमगड, जि. पालघर) आणि सचिव महेश नाईक (रा. वाडा, जि. पालघर) यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच मासवण अनुदानित आश्रमशाळेतील मुलींच्या अधीक्षिका अमृता सावंत, मुख्याध्यापक राहुल संख्ये आणि मुलांचे अधीक्षक पांडुरंग रामचंद्र लहारे यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्यांपैकी डहाणू प्रकल्प अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. याबाबत अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांनी लेखी आश्वासन देताना संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत स्वतंत्र व निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, तसेच चौकशीत दोष आढळल्यास कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच कुटुंबातील सदस्यांना शाळेत नोकरी देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, याबाबतही लेखी आश्वासन देण्यात आले आहे.

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने फिरते वैद्यकीय पथक सुरू करण्यात आले आहे. लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाची पहिली फेरी २७ ऑगस्ट रोजी मासवण आश्रमशाळेत झाली.

मासवण आश्रमशाळा प्रकरणातील उच्चस्तरीय चौकशीदरम्यान दोष व गुन्हे सिद्ध झाल्यास त्यानुसार पुढील कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या कारवाईनंतर आंदोलनाला तात्पुरता विराम मिळाला असला, तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि आश्रमशाळांच्या व्यवस्थेतील सुधारणांचा प्रश्न कायम असून, सामाजिक जबाबदारी म्हणून हा लढा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments