अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
कोसेसरी :- पालघर जिल्ह्यातील डोंगर-दऱ्यांमध्ये आणि सूर्या नदीच्या काठी वसलेले कोसेसरी गाव गेल्या ४५ वर्षांपासून गणेशोत्सवाची परंपरा जपत आहे. सन १९८१ पासून गावात सुरुवातीला मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करून गणेशाची स्थापना करण्याची परंपरा सुरू झाली. आज या परंपरेला तब्बल ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
गणपती उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण गाव एकत्र येते, ही गावकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावात सात दिवसांचा गणपती बसवण्याची परंपरा आहे.
या सात दिवसांत महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात. त्याचबरोबर आदिवासी समाजाच्या पारंपरिक कला आणि संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी कांबड नाच, गौरी नाच, तारपा नाच, ढोल नाच, टिपरी नाच अशा विविध पारंपरिक नृत्यांचे आयोजन केले जाते.
गणेशोत्सवातील सातही दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरे केले जातात. या उत्सवामुळे गावातील नागरिकांमध्ये एकता, शांतता, प्रेम आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वी भांडणखोर गाव म्हणून ओळख असलेल्या गावात आज नागरिक गुण्यागोविंदाने आणि एकोप्याने राहत आहेत, ही या गणेशोत्सवाची मोठी जमेची बाजू आहे.
आज कोसेसरी गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. विशेष म्हणजे सूर्या नदीवर सुमारे २० कोटी रुपये खर्चाचा मोठा पूल बांधण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला आणखी चालना मिळणार आहे.
सूर्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव, कोसेसरी हा केवळ धार्मिक उत्सव न राहता गावातील एकता, आदिवासी संस्कृती आणि सामाजिक सलोखा जपणारा उत्सव बनला आहे.
या गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शैलेश करमोडा, माजी उपसभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य, पालघर, तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते रत्ना राबड, मधुकर भावर, दिनेश सुतार, रमेश सापटा सर, नरोत्तम वरठा सर, योगेश दिवा, संदीप विष्णू दौडा, अजय खेवरा, मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि समस्त गावकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
गावकऱ्यांच्या एकजुटीने आणि उत्साहाने गणपती बाप्पाचे विसर्जनही दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडते.
४५ वर्षांची परंपरा, आदिवासी संस्कृतीचा वारसा आणि गावाच्या एकतेचा उत्सव म्हणजेच कोसेसरीचा गणेशोत्सव!

Post a Comment
0 Comments