एचडीएफसी बँक उपलब्ध करून देणार निधी
जलसुरक्षा, पाणलोट विकास, हवामानपूरक शेती व उपजीविका वृद्धीवर भर
प्रमोद एन. चिंतलवार
तालुका प्रतिनिधी गडचिरोली
मो. नं. 9405133420
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेला पूरक पाऊल म्हणून जिल्हा प्रशासन, गडचिरोली आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) यांच्यात आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे बिगर आर्थिक सामंजस्य करार करण्यात आला. या सहकार्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी एचडीएफसी बँक निधी उपलब्ध करून देणार असून, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टमार्फत प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा तर वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या वतीने संस्थेचे कार्यकारी संचालक प्रकाश केसकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जलसुरक्षा, एकात्मिक पाणलोट विकास, नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, हवामान बदलास अनुकूल शेती, उपजीविका वृद्धी आणि स्थानिक संस्थांचे बळकटीकरण यासाठी परस्पर सहकार्याची चौकट या करारातून निश्चित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले असून, विविध विकास उपक्रमांमध्ये शासनासोबत खासगी क्षेत्र, सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या संस्था आणि विषयतज्ज्ञ संस्थांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याला पूरक म्हणून जिल्ह्यातील स्थानिक गरजा आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधने विचारात घेऊन शाश्वत विकासाचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी या सहकार्याचा उपयोग होणार आहे.
"एचडीएफसी बँकेचे आर्थिक सहकार्य; अंमलबजावणीची जबाबदारी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टकडे"
या उपक्रमांतर्गत एचडीएफसी बँकेकडून प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडणार आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित शासकीय विभागांच्या समन्वयातून स्थानिक गरजा विचारात घेऊन उपक्रमांचे नियोजन, विविध शासकीय योजनांशी सांगड, लोकसहभाग आणि क्षमता वृद्धीवर भर दिला जाणार आहे.
जिल्हा प्रशासन आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्यात झालेला सामंजस्य करार बिगर आर्थिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे या करारातून जिल्हा प्रशासनावर स्वतंत्र आर्थिक दायित्व निर्माण होणार नाही. प्रकल्पांसाठी आवश्यक आर्थिक सहकार्य एचडीएफसी बँकेकडून उपलब्ध होणार असून, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
"जलसुरक्षा आणि हवामानपूरक शेतीला प्राधान्य"
सामंजस्य करारांतर्गत एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास, जलसुरक्षा, नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, हवामान बदलास अनुकूल व सक्षम शेती, उपजीविका वृद्धी, समुदायस्तरीय संस्थांचे बळकटीकरण आणि क्षमता वृद्धी या क्षेत्रांवर विशेष भर राहणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध जल व नैसर्गिक संसाधने तसेच स्थानिक समुदायांच्या गरजा विचारात घेऊन विविध उपक्रमांचे नियोजन केले जाणार आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या संबंधित योजना आणि कार्यक्रमांची सांगड घालून उपलब्ध संसाधनांचा अधिक परिणामकारक वापर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
"लोकसहभागातून स्थानिक संस्था बळकट करणार"
विकास उपक्रमांच्या नियोजन आणि अंमलबजावणीत स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. ग्रामस्तरावरील संस्थांची क्षमता वाढविणे, जल व नैसर्गिक संसाधनांचे दीर्घकालीन संवर्धन, हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम शेतीपद्धतींचा प्रसार आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी बळकट करणे ही या सहकार्याची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
जिल्हा प्रशासनाचा समन्वय, एचडीएफसी बँकेचे आर्थिक सहकार्य आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे तांत्रिक ज्ञान व अंमलबजावणीचा अनुभव यांची सांगड घालून गडचिरोली जिल्ह्यात जलसुरक्षा, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, हवामानपूरक शेती आणि उपजीविका क्षेत्रातील शाश्वत विकास उपक्रमांना चालना देण्याचा या सहकार्याचा उद्देश आहे.

Post a Comment
0 Comments