Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

_निर्धारित रकमेपेक्षा जास्त वसुलीचा आरोप; तराजू नेल्याची माहिती, प्रकरण पोलीस ठाण्यात_



विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मो. 9421856931

एटापल्ली :- तालुक्यातील जारावंडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या आठवडी बाजारात वसुलीच्या रकमेवरून व्यापारी आणि बाजार कंत्राटदार यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याची घटना रविवारी घडली. ग्राम पंचायत कडून ठरवून दिलेल्या वसुलीपेक्षा अधिक रक्कम मागितल्याचा आरोप करण्यात आला असून, यावरून वाद वाढल्याची माहिती आहे. दरम्यान, पैशांच्या वसुलीवरून कंत्राटदाराने व्यापाऱ्यांकडील तराजू घेऊन गेल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकारानंतर हे प्रकरण जारावंडी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे


जारावंडीचा आठवडी बाजार दर रविवारी भरतो. छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या जारावंडीमध्ये छत्तीसगडसह परिसरातील अनेक व्यापारी मोठ्या संख्येने व्यापारासाठी बाजारात येतात. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या दृष्टीने हा बाजार महत्त्वाचा मानला जातो. मात्र, बाजारातील मूलभूत सुविधांची अवस्था बिकट असून व्यापाऱ्यांना चिखल, अस्वच्छता आणि गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.


विशेष म्हणजे, आठवडी बाजाराच्या जागेवर आवश्यक प्रमाणात मुरूम टाकण्यात न आल्याने पावसाळ्यात संपूर्ण बाजार परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. व्यापाऱ्यांना आपला माल घेऊन चिखलातून व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे ग्राहकांनाही बाजारात येताना अडचणी निर्माण होतात आणि त्याचा थेट परिणाम व्यापारावर होत असल्याची व्यापाऱ्यांची नाराजी आहे. अशा परिस्थितीत बाजारातील सुविधांकडे दुर्लक्ष होत असताना वसुलीच्या रकमेवरून व्यापाऱ्यांशी वाद निर्माण होणे हा गंभीर प्रश्न असल्याचे बोलले जात आहे.


दरम्यान, निर्धारित वसुली किती आणि प्रत्यक्षात व्यापाऱ्यांकडून किती रक्कम मागितली जात होती, याची अधिकृत माहिती तसेच तराजू नेल्याच्या घटनेची वस्तुस्थिती पोलीस तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. ग्रामपंचायतीने बाजार कंत्राटदाराला कोणत्या अटी व दरांवर बाजाराचा ठेका दिला, व्यापाऱ्यांकडून कोणत्या प्रकारची वसुली करण्यास परवानगी आहे आणि त्यापेक्षा अधिक रक्कम घेतली जात असल्यास त्यावर नियंत्रण कोणाचे, याबाबतही ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत.


बाजारातून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळत असेल तर त्या बदल्यात व्यापाऱ्यांना किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे. वसुलीबाबत व्यापारी आणि कंत्राटदार यांच्यात झालेल्या वादाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, तसेच बाजारातील चिखल, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून होत आहे



 *बाजारातील गैरव्यवस्थेला ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार? व्यापारी-नागरिकांचा सवाल* 


आठवडी बाजारातील वसुलीचा वाद, व्यापाऱ्यांकडून निर्धारित रकमेपेक्षा जास्त वसुली होत असल्याचे आरोप आणि बाजारातील चिखल व अस्वच्छतेच्या समस्येला ग्रामपंचायत प्रशासनच जबाबदार असल्याचे व्यापारी व नागरिकांचे म्हणणे आहे. बाजाराचा लिलाव करताना वसुलीच्या अटी व दर स्पष्टपणे निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना प्रत्यक्ष बाजारात वाद निर्माण होत असल्याने प्रशासनाच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. व्यापाऱ्यांकडून नियमबाह्य वसुली होत असल्यास ती रोखण्याची जबाबदारी कोणाची? आणि बाजारातून उत्पन्न मिळविणाऱ्या ग्रामपंचायतीने व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधा का उपलब्ध करून देऊ नयेत? असा सवाल व्यापारी व नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे

Post a Comment

0 Comments